बेळगाव लाईव्ह:नियमबाह्य पद्धतीने भूसंपादन करून विकासकाम राबविणाऱ्या महानगरपालिकेला उच्च न्यायालयाने दणका दिला. गेल्या पंधरा दिवसांपासून गाजत असलेल्या बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते ओल्ड पी. बी. रोड रस्ते विकासकामातील विस्थापितांच्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर आज बेळगाव जिल्हा पालकमंत्र्यांनीही मौन सोडले असून सदर नुकसानभरपाईची रक्कम महानगरपालिकेनेच व्यवस्था करून द्यावी, अशी प्रतिक्रिया दिली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रांताधिकाऱ्यांनी मनपाला दिलेल्या आदेशानंतर मनपाचे धाबे दणाणले. आपल्या अंगावरील जबाबदारी झटकण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी अनेक शकला लढविल्या. विरोधकांचा निर्णय डावलून विस्थापितांना एकाच वेळी नुकसानभरपाईची रक्कम देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. परंतु विरोधकांनी देखील आता सत्ताधाऱ्यांना काटशह देण्याचे ठरविले असून किंगमेकर सतीश जारकीहोळी यांनी यासाठी विशेष अनुदान देता येणार नाही असेही स्पष्ट केले.
आज बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आम.मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, कि रस्ते विकासकामात ज्या मालमत्ताधारकांच्या जमिनी गेल्या त्या नुकसानग्रस्त मालमत्ताधारकांना नुकसान भरपाई देण्याच्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती स्थापन करून चौकशी केली जाईल. भरपाई देण्याचा आदेश उच्च न्यालयाने दिला असून न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य कालावधीत भरपाईची रक्कम अदा केली जाईल.
तत्कालीन मनपा आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात हि बाब न आणताच ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले असून याबाबत चौकशी करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. सदर रस्ता हा स्मार्ट सिटी योजने अंतर्गत निर्माण करण्यात आला होता. यामुळे स्मार्ट सिटीने हि भरपाई देणे गरजेचे होते. मात्र स्मार्ट सिटीने आपल्यावरील जबाबदारी झटकली असून यासंदर्भात आम्ही कायदेशीर लढा उभारण्यासाठीही तयार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
काल महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही सहमत नाही. विरोधी पक्ष मनपाला या सर्व गोष्टीतून वाचवणार नाही. किंवा एकटे जिल्हा पालकमंत्री या प्रकरणी लक्ष घालू शकणार नाहीत. सत्ताधाऱ्यांनी स्वतःची सुरक्षा लक्षात घेत हा निर्णय घेतला असून विकासकामासाठी दिलेले अनुदान, स्मार्ट सिटी अनुदान यातूनच मनपाने आता नुकसान भरपाईची तजवीज करावी, असे सतीश जारकीहोळी म्हणाले.
जिल्ह्यात पुन्हा सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा जनजीवनावर परिणाम होत असून सर्वेक्षणाच्या कामात अडथळा निर्माण झाल्याचे पालकमंत्री म्हणाले. अनेक ठिकाणी पुन्हा समस्यांनी डोके वर काढले असून जोवर पावसाचा जोर ओसरत नाही तोवर दुरुस्तीचे काम हाती घेता येणे शक्य नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.