बेळगाव लाईव्ह:क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा सोसायटीच्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून या सोसायटीच्या बेळगाव जिल्ह्यातील 14 सह एकूण 17 मालमत्तांची येत्या मंगळवार दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत ई-लिलावाद्वारे विक्री होणार आहे.
आयएमए प्रकरणासारख्या घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष प्राधिकरणांद्वारे गेल्या सोमवारी 19 ऑगस्ट रोजी लिलावाबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
लिलावात सहभागी होण्याची अंतिम तारीख शनिवार दि. 24 ऑगस्ट ही असून या अंतिम मुदतीसह लिलाव ऑनलाइन केला जाईल. सदर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी सोमवार दि. 26 ऑगस्टपर्यंत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
संगोळ्ळी रायण्णा सोसायटीतून जप्त करण्यात आलेल्या ज्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे त्यांचे संपूर्ण मूल्यमापन करण्यात आले आहे. जारी केलेली अधिसूचना प्रत्येक लॉटचे मूल्य, लिलावात सहभागी होण्यासाठी आवश्यक ठेव आणि किमान बोली वाढ याबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते.
पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्याने या मालमत्तांचा लिलाव करण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे. सदर लिलावातून मिळालेली रक्कम गेल्या डिसेंबर 2023 मध्ये अर्ज सादर केलेल्या ठेवीदारांना वितरीत केली जाईल. यासाठी बेंगलोर येथे एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी बेळगावमधील अनेक ठेवीदारांनी आधीच आवश्यक कागदपत्रे सादर केली असून आता ते त्यांच्या ठेवी परत मिळण्याची वाट पाहत आहेत.
संगोळ्ळी रायण्णा सोसायटीच्या बेळगाव शहर आणि तालुक्यातील मालमत्तांमध्ये सीटीएस क्र. 3546, रिसालदार गल्ली, हिंडलगा, कंग्राळी खुर्द, हनुमाननगर, बाळेकुंद्री खुर्द, केके कोप्प आणि अंकलगी या ठिकाणच्या मालमत्तांचा समावेश आहे.
संगोळ्ळी रायण्णा सोसायटीचा घोटाळा 2017 मध्ये उघडकीस आल्यानंतर सरकारकडून त्वरीत कारवाई करण्याद्वारे सोसायटीशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आली. यातील कांही मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयानेही जप्त केल्या आहेत. आता यावेळची लिलाव प्रक्रिया यशस्वी होईल आणि आपल्याला आपली ठेव रक्कम परत मिळेल अशी आशा ठेवीदार बाळगून आहेत.