बेळगाव लाईव्ह : १२ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु होणाऱ्या खानापूर तालुक्यातील नंदगड या गावात श्री महालक्ष्मी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच तयारी सुरु करण्यात आली असून सकल मराठा समाजाच्या वतीने यात्रा कमिटीला एक पत्र सादर करण्यात आले आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नंदगड मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात्रा काळात दारूबंदी, आहेर – देणे घेणे या प्रथेवर नियंत्रण यासारख्या महत्वपूर्ण गोष्टींसाठी यात्रा कमिटीला पत्र लिहिण्यात आले आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड हे गाव मोठे आहे.
यात्रा काळात मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. ग्रामस्थांच्या घराची रंगरंगोटी यासह येणाऱ्या पै पाहुण्यांची जेवणाची, आहेराची यासह अनेक गोष्टींची बडदास्त केली जाते. यात्रा साजरी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन समाजाचा वाटा असतो. यात्राकाळात होणाऱ्या अनावश्यक खर्चामुळे अनेक नागरिकांची आर्थिक फरफट होते.
तसेच कित्येक लोक कर्जबाजारीपणाला सामोरे जातात. यामुळे यात्राकाळात दारूबंदी करण्यात यावी, आहेर प्रथेवर नियंत्रण आणले जावे यासह अनेक बाबींचा समावेश असणारे पत्र सकल मराठा समाजाचे बेळगावचे समन्वयक गुणवंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यात्रा कमिटीला सादर केले आहे.
आपला समाज व्यसनाधीन होत असून यावर आळा घालण्यासाठी आणि व्यसनाधीनता नियंत्रणात आणण्यासाठी दारूबंदीची गरज आहे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यावेळी मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार, माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई, पत्रकार प्रकाश बेळगोजी आदींची उपस्थिती होती.
सकल मराठा समाजाने अत्यंत विचारपूर्वक असा निर्णय घेत पत्र लिहिले असून यात्रा कमिटी या पत्राची दखल कशापद्धतीने घेईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सकल मराठा समाजाने यात्रा कमिटीकडे उपरोक्त सल्ल्याचा विचार करून सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली आहे.