बेळगाव लाईव्ह:म्हैसूरमध्ये भाजपची पदयात्रा काढली जात असताना दुसरीकडे बेळगाव शहराबाहेरील एका रिसॉर्टमध्ये भाजपचे नेते बसनगौडा पाटील -यत्नाळ आणि रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली असंतुष्ट नेत्यांच्या बैठका होत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून बेळगावमध्ये ठाण मांडून असलेले बसनगौड यत्नाळ असंतुष्ट नेत्यांच्या गटागटाने बैठका घेऊन राज्याध्यक्षांविरुद्ध मोर्चे बांधणी करत असल्याचे कळते.
गेल्या दोन दिवसापासून बेळगाव शहराबाहेरील एका रिसॉर्टमध्ये मुक्काम ठोकून असलेले भाजप नेते बसनगौडा पाटील -यत्नाळ यांनी असंतुष्ट नेत्यांच्या गुप्त बैठका घेऊन भाजप राज्याध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या विरुद्ध बंडाची तयारी सुरू केली आहे. यासाठी ते विजयेंद्र यांच्याबाबतीत असमाधानी असणाऱ्या भाजप आमदारांना एक एकटे बोलवून त्यांच्याशी चर्चा करत आहेत.
एकंदर राज्यात राजकीय खळबळ उडवून देणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींना सध्या बेळगावमध्ये प्रारंभ झाला आहे. बसनगौडा पाटील-यत्नाळ, रमेश जारकीहोळी, प्रताप सिंह यांच्यासह अनेक भाजप आमदार आणि कांही भाजप नेत्यांच्या बेळगाव शहराबाहेरी रिजंटा रिसोर्टमध्ये बैठका सुरू असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे.
या बैठका लक्षात घेता वादग्रस्त मुडा प्रकरणानंतर राज्यात आणखी एका खळबळजनक राजकीय घडामोडीला मूर्त स्वरूप देण्यासाठी बेळगावात तयारी केली जात असल्याचे स्पष्ट होते. सीमावर्तीय बेळगाव जिल्ह्यात बेळगाव शहराबाहेर जमलेल्या भाजप नेत्यांमध्ये बसनगौडा पाटील यत्नाळ, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, अरविंद लिंबावळी, माजी खासदार प्रताप सिंह, अण्णासाहेब जोल्ले, जी. एम. सिद्धेश्वर यांच्यासह 10 हून अधिक भाजप नेत्यांचा समावेश असून त्यांच्या बैठका सुरू आहेत.
वाल्मिकी घोटाळ्या विरोधात कुडलसंगम ते बळ्ळारीपर्यंत पदयात्रा काढण्याची तयारी भाजप करत आहे. या पदयात्रेची रूपरेषाही बेळगावमध्येच निश्चित केली जात आहे. एकंदर बेळगावमध्ये भाजप राज्याध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या विरुद्ध पक्षातील असंतुष्ट बंडखोर नेते मंडळींनी जोरदार मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.