बेळगाव लाईव्ह : भाऊ-बहिणीच्या नात्याचं, त्यांच्यातल्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे रक्षाबंधनचा सण. वर्षभर सर्वच भाऊ-बहीण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनाला बाजारात नवीन ट्रेंड असतो.
यंदा रंगीबेरंगी राख्यांमुळे बाजारपेठ फुलली असून या वर्षी अनेक नवे ट्रेंड राख्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी फॅन्सी राख्यांनी ट्रेडिशनल राख्यांची जागा घेतली आहे. एकीकडे लहान मुलांमध्ये कार्टूनची राखी; तर मोठ्यांची पसंती ही चूडी राखी आणि इको फ्रेंडली ब्रेसलेट राख्यांना आहे. १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार असून या सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमधील होलसेल बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांगुळ गल्लीमध्ये आकर्षक, रंगीबेरंगी राख्या उपलब्ध झाल्या आहेत.
बहीण भावाचे नाते अधिक दृढ करणाऱ्या या सणात बहिणी आपल्या आवडीची राखी बांधण्यास प्राधान्य देतात. पांगुळ गल्लीसह बेळगावमधील विविध ठिकाणी राख्यांचे भव्य स्टॉल्स उभारण्यात आले असून मारुती गल्ली, कडोलकर गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली आदी ठिकाणी राख्यांची बाजारपेठ सजली आहे. एकीकडे गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरु असून व्यापारी वर्ग दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर आकर्षक वस्तू उपलब्ध करण्यासाठी धडपडत आहेत.
बेळगाव मधील विविध गल्लोगल्ली राख्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले असून विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने खरेदीसाठी महिला व युवतींची लगबग सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या किमतीत वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. पाच रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतच्या राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पांगुळ गल्ली येथील चेतन राठोड या विक्रेत्याने ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना दिली.
गोंडे, छोटा भीम, मेरे प्यारे भैय्या, ओम, स्वस्तिक, फॅन्सी जरी, घुंगरू, लाख, राजस्थानी मिरर वर्क, स्टोन राखी, काचेची सजावट असलेल्या राख्यांसह चांदीच्या राख्या व कार्टुनमध्ये मोटू -पतलू, डोरेमॉन, स्पायडर मॅन सह संगीत व लायटिंग असलेल्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कलाकुसरीने नटलेल्या राख्यांना अधिक पसंती असून मुंबई, सुरत, अहमदाबाद, कोलकाता आदी ठिकाणाहून विविध प्रकारच्या राख्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत, असेही चेतन राठोड यांनी सांगितले.