बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील तानाजी गल्ली येथील बोळाच्या ठिकाणी रेल्वे मार्ग शेजारी मोठ्या प्रमाणात कचऱ्याच्या पिशव्या व घाण केरकचऱ्याचा ढिगारा साचला असून तो ताबडतोब स्वच्छ करण्याची मागणी केली जात आहे.
कचरा गाडी वेळच्यावेळी येत नसल्यान आणि सोयीच्या जागी कचराकुंड नसल्यामुळे तानाजी गल्ली जवळील रेल्वे मार्गाच्या आसपासच्या रहिवाशांकडून रेल्वे रुळाशेजारीच कचरा फेकण्याचा गैरप्रकार अलीकडे वाढला आहे.
महापालिकेकडून वेळच्यावेळी कचऱ्याची उचल केली जात नसल्यामुळे तानाजी गल्ली येथील बोळाच्या ठिकाणी रेल्वे मार्ग शेजारील टाकण्यात येणाऱ्या या कचऱ्याचा ढिगारा दिवसेंदिवस वाढत आहे.
गेल्या महिन्याभरापासून महापालिकेची कचरा गाडी या भागात फिरकलीच नसल्यामुळे सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याच्या पिशव्या व घाण केरकचऱ्याचा ढिगारा साचला आहे.
परिणामी अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरू लागली आहे. तेंव्हा लोकप्रतिनिधी व मनपा आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच रेल्वे मार्ग शेजारी मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचऱ्याची उचल करून परिसर स्वच्छ करावा अशी जोरदार मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.