बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरामध्ये भाजपच्या आंदोलनाप्रसंगी काल माजी आमदार संजय पाटील यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज सकाळी आंदोलन छेडून आमदार पाटील यांच्या प्रतिमेला शेण फासून निषेध व्यक्त केला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव शहर व जिल्हा शाखेतर्फे काल शनिवारी आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार संजय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करून संतप्त महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी सकाळी राणी चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केले.
यावेळी माजी आमदार संजय पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देण्याबरोबरच त्यांच्या प्रतिमेला शेण फासून महिला कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. रस्त्यावर ठिय्या मारून आमदारांच्या प्रतिमांना शेण फासण्याच्या या आंदोलनामुळे चन्नम्मा चौकातील वाहतुकीस कांही काळ अडथळा निर्माण झाला होता. सदर आंदोलनात बहुसंख्य महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
.. तर मी दिलगिरी व्यक्त करतो -माजी आम. संजय पाटील
भाजपच्या कालच्या आंदोलनाप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांबद्दल वाईट बोललो नाही. मात्र तरीही जर माझ्या तोंडून अनावधानाने कांही अपशब्द गेले असतील तर मी त्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असे माजी आमदार संजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव शहर व जिल्हा शाखेतर्फे काल आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार संजय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करून महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर वैयक्तिक व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण देताना माजी आमदार संजय पाटील बोलत होते. ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे काल आंदोलन छेडले होते. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना माझ्या तोंडातून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अपशब्द बाहेर पडले असल्याचा आरोप केला जात आहे. सिद्धरामय्या, देवेगौडा, येडियुरप्पा यांचा मी केंव्हाही कर्नाटकातील अनुभवी बुजुर्ग नेते म्हणून आदर करतो. त्यांच्याबद्दल मला अभिमान देखील आहे. त्यामुळे काल प्रतिक्रिया देत असताना मुख्यमंत्र्यांबद्दल जर माझ्या तोंडून अनावधानाने कांही अपशब्द गेले असतील तर मी त्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. मी कोणाला जाणून बुजून वाईट बोललेलो नाही. तथापि कांही काँग्रेस नेते माझ्या बोलण्याचा विपर्यास करून पोलिसांना हाताशी धरून मुद्दाम माझ्याविरुद्ध असंतोषाचे वातावरण निर्माण करत आहेत.
मागील वेळी देखील कांही महिलांना पैसे देऊन माझ्या घराच्या दारात आंदोलन करण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी अर्वाच्य भाषा वापरून शिवीगाळ करून गोंधळ घालण्याचा, गुंडगिरीचा प्रकार करण्यात आला होता. मी एक माजी लोकप्रतिनिधी आहे. माझ्या प्रतिक्रिया मी आंदोलनाप्रसंगी व्यक्त करणारच. माझ्याकडून चूक होणार नाही, मात्र अनावधानाने ती झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावर कारवाई करायची असेल तर पोलीस खाते आहे, न्यायालय आहे, त्याद्वारे ती केली जावी. आंदोलन करणाऱ्या महिलांबद्दल मी वाईट बोलणार नाही. मात्र त्यांनी घातलेला गोंधळ, केलेली शिवीगाळ किंवा कृती पाहता काँग्रेसचे सरकार सत्तेवर असल्याचा फायदा घेऊन पोलिसांच्या सहकार्याने असे प्रकार सुरू राहिले तर कोण सुरक्षित राहील? लोकप्रतिनिधींच्या घरासमोर गोंधळ गुंडागिरी केली जात असेल तर सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षिततेचे काय? मी पोलिसांना देखील विनंती केली आहे की माझ्या घरासमोर येऊन कोणी दंगा घालणार नाही याची काळजी घ्यावी.
अन्यथा कांही अनुचित, चुकीचे घडल्यास त्याला जबाबदार तुम्हीच असाल. मी पोलीस आणि न्यायव्यवस्था यांचा आदर, गौरव करतो. कायद्याच्या चौकटीत जे कांही केले जाईल ते मी मान्य करेन. कोणीही येऊन आमच्या घरासमोर गोंधळ घालतोय. त्यामुळे आसपासच्या लोकांवर होणारा परिणाम, त्यांचे आमच्याबद्दल होणारे वाईट मत? याला कोण उत्तर देणार. पोलीस असू दे प्रशासन असू देत काँग्रेस सरकारने आपल्या सत्तेचा या पद्धतीने दुरुपयोग करू नये अशी माझी विनंती आहे, असे माजी आमदार संजय पाटील यांनी शेवटी स्पष्ट केले.