बेळगाव लाईव्ह :नावगे क्रॉस येथील स्नेहम टॅपिंग सोल्यूशन्स प्रा. लि. या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना तसेच जखमी कामगारांना सरकारने देखील नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनने (सीआयटीयू) केली आहे.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनतर्फे आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना सीआयटीयूच्या बेळगाव तालुका अध्यक्ष मंदा नेवगी म्हणाल्या परवा नावगे क्रॉस येथील कारखान्याला आग लागून जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेतील मृत 22 वर्षीय यल्लाप्पा गुंड्यागोळ या कामगाराच्या अस्थी त्याच्या कुटुंबीयांना पोत्यात घालून देण्यात आल्या हे अतिशय चुकीचे आहे. यल्लाप्पा कामगार असला तरी माणूस होता.
त्यामुळे त्याच्या अस्थी व्यवस्थित सन्मानाने त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करावयास हव्या होत्या. आगीच्या दुर्घटनेमुळे संबंधित कारखान्यातील कामगार बेरोजगार झाले आहेत.
त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जावा. त्याचप्रमाणे सदर दुर्घटनेतील मृत कामगाराचे कुटुंबीय आणि जखमी कामगारांना कारखान्याच्या मालकासह सरकारने देखील त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे, असे नेवगी यांनी सांगितले.