बेळगाव लाईव्ह :अहोरात्र 24 तास काम करून देखील इतर राज्यांच्या तुलनेत फार कमी मिळणारा स्टायपेंड तात्काळ वाढविण्यात यावा, या मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून मौन आंदोलन करणाऱ्या बीम्स हॉस्पिटलच्या निवासी पीजी डॉक्टर संघटनेतर्फे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज मंगळवारी रस्त्यावर चहा विक्रीचा अभिनव उपक्रम राबवून ‘गांधीगिरी’ करण्यात आली.
बीम्स हॉस्पिटलमध्ये पीजी करणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंड अर्थात छात्रवृत्तिमध्ये गेल्या तीन वर्षापासून वाढ करण्यात आलेली नाही. या डॉक्टरांना इतर राज्यांच्या तुलनेत फारच कमी स्टायपेंड दिले जात असल्याची तक्रार आहे.
याच्या निषेधार्थ तसेच स्टायपेंड वाढवून मिळावा या मागणीसाठी हॉस्पिटलमधील पीजी डॉक्टर्सनी मौन आंदोलन हाती घेतले आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी हॉस्पिटल बाहेर रस्त्यावर स्टॉल मांडून 5 रुपयाला एक कप या दराने चहाची विक्री करण्याचा अभिनव उपक्रम राबविला.
हातात आपल्या मागणीचे फलक घेऊन चहा विक्री करण्याचा डॉक्टरांचा उपक्रम साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचप्रमाणे अवघ्या 5 रुपयाला छोटा ग्लासभर चहा मिळत असल्यामुळे नागरिक ही डॉक्टरांच्या स्टॉलच्या ठिकाणी गर्दी करताना दिसत होते.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना ऑर्थोपेडिक सर्जरी आणि पीजी करणाऱ्या एका डॉक्टरने 24 तास अहोरात्र काम करून देखील इतर राज्यांच्या तुलनेत आम्हाला स्टायपेंड (छात्रवृत्ती) फार कमी मिळतो अशी तक्रार केली.
आमचेही कुटुंब आहे, आम्हालाही घरी पैसे द्यावे लागतात. त्यामुळे थोडा तरी सन्मानजनक पगार आम्हाला मिळाला पाहिजे. त्यासाठीच आम्ही मौन आंदोलन करत आहोत. आमच्या आंदोलनाचा आजचा नववा दिवस असूनही अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आपत्कालीन सेवा देत आम्ही आंदोलन करत आहोत. स्टायपेंडमध्ये समाधानकारक वाढ करण्यात यावी, एवढीच आमची मागणी आहे.
चहाची विक्री करण्याच्या स्वरूपात आंदोलन करण्याच्या आमचा उद्देश ‘चहावाले देखील आमच्या स्टायपेंडपेक्षा जास्त पैसे कमावतात, हे आम्हाला दर्शवायचे आहे. तसेच डॉक्टर असून देखील आम्ही चहावाल्याच्या पात्रतेचेच आहोत का? याचा विचार केला जावा यासाठी जनजागृती करिता आम्ही हा चहा विक्रीचा उपक्रम राबवत असल्याचे त्याने सांगितले.
बिम्सच्या निवासी डॉक्टर संघटनेतर्फे बोलताना अन्य एका पीजी डॉक्टरने स्टायपेंड वाढीसाठी आम्ही गेल्या 8 दिवसांपासून मौन आंदोलन करत असल्याचे सांगितले. गेल्या चार वर्षापासून आमचे स्टायपेंड वाढविण्यात आलेले नाही. हे चौथे वर्ष असून आमचे स्टायपेंड वाढविण्यात यावे आणि ते वेळेवर दिले जावे, एवढीच आमची सरकारकडे मागणी आहे. डॉक्टरी व्यवसाय हा खरंतर उदात्त व्यवसाय आहे.
तथापि दिवस-रात्र काम करून देखील योग्य मोबदला दिला जात नसल्यामुळे आम्हा डॉक्टरांना आज नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागले आहे.
आमच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा चहा विक्रीचा अभिनव उपक्रम राबविला आहे असे सांगून आमच्या मागण्या संदर्भात बेंगलोर येथे आमचे तेथील सहकारी डॉक्टर संबंधित मंत्र्यांशी आज चर्चा करणार आहेत, अशी माहितीही त्या पीजी डॉक्टरने दिली. रस्त्यावर स्टॉल मांडून चहा विक्रीच्या स्वरूपात गांधीगिरी करणाऱ्या बिम्सच्या निवासी पीजी डॉक्टर्समध्ये महिला डॉक्टरांचा सहभागही लक्षणीय होता.