बेळगाव लाईव्ह:श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मुंबईतील सांदीपनी आश्रमात 1964 मध्ये सुरू झालेल्या विश्व हिंदू परिषदेचे (वि.हीं.प.) हे 60 वे वर्ष आहे. या षष्ठीपूर्ती निमित्त विश्व हिंदू परिषद-उत्तर कर्नाटक प्रांत
बेळगाव जिल्हा शाखेतर्फे येत्या रविवार दि. 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2024 या कालावधीत 3 वेळा ओंकार, 13 वेळा श्री राम जय राम जय जय राम, तारक मंत्र, शिवाष्टकम स्तोत्र, श्री ललिता सहस्रनाम जप आणि हनुमान चालिसा पठणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शहरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये वि.हीं.प. जिल्हाध्यक्ष प्रमोद कुमार वककुंदमठ यांनी ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 60 वर्षांत विश्व हिंदू परिषदेने एक धार्मिक संघटना म्हणून आपल्या कार्याची व्याप्ती केवळ भारतातच नव्हे तर जगातील इतर सुमारे 40 देशांमध्ये विस्तारली असून धर्माच्या कार्यात विश्व हिंदू परिषद व्यस्त आहे.
परमपूज्य संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु समाजात सेवा आणि सुरक्षेच्या माध्यमातून धर्म जागृती, सत्संगाच्या माध्यमातून आपली संस्कृती, वारसा, धर्म यांचे रक्षण करून प्रत्येकाच्या हृदयात देव आणि देशाप्रती भक्ती निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी युवकांसाठी ‘बजरंग दल’, युवतींसाठी ‘दुर्गा वाहिनी’ आणि माताभगिनींसाठी ‘मातृशक्ती’ या संस्था सातत्याने कार्यरत आहेत.
देशभरातील 75 हजार गावांमध्ये 75 हजार विश्व हिंदू परिषदेच्या शाखा तसेच देशातील सर्व प्रांत, जिल्हे आणि तालुक्यांमध्ये समिती आहेत. देशातील सुमारे 22 हजार गावांमध्ये मातृशक्ती आणि 8500 गावांमध्ये दुर्गा वाहिनीचा उपक्रम पोहोचला आहे. विहींप देशभरात 14,000 सेवा कार्य, 36,000 सत्संग, आणि दरवर्षी 85,000 गोरक्षण करत असते. गेल्या 2 वर्षात 14,000 धर्मांतरितांचे धर्मांतर, दरवर्षी लव्ह जिहादला बळी पडलेल्या 4,500 हून अधिक हिंदू मुलींचे संरक्षण आणि पुनर्वसन केले जाते. बजरंग दलाच्या शाखांचा विस्तार देशातील 62,000 गावांमध्ये आहे. विहींप उत्तर कर्नाटकातील 18 ठिकाणी अनाथांसाठी बाल कल्याण केंद्र, सेवा उपक्रमांद्वारे शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, समानता प्रदान करण्याचा प्रयत्न करीत आहे.
गेल्या 60 वर्षांत विश्व हिंदू परिषदेने श्री रामजन्मभूमी, अमरनाथयात्रा, राम सेतू आणि तिरुपतीतील मतांतर यांसारख्या मुद्द्यांमध्ये हिंदू समाजातील संत आणि नेत्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच उडपी येथे सुमारे 2500 पेक्षा जास्त संतांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. दर वर्षी हनुमामाला धारी अभियान राबविले जाते. या सर्व प्रयत्नामुळे आज अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराची निर्मिती झाली. ज्ञानव्यापी मंदिराच्या कायदेशीर लढाई बरोबरच विहींपने मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराच्या न्यायासाठी लढाईची सुरवात केलेली आहे. राष्ट्र हितासाठी विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रीय स्तरावर केलेल्या धार्मिक कार्यांबरोबरच उत्तर कर्नाटकातही अनेक सेवा कार्ये सुरू आहेत. त्यात बेळगाव मधील बाल कल्याण केंद्र, दरवर्षी होणारे रक्तदान शिबिर, गौ-रक्षा आदी उपक्रम महत्त्वाचे आहेत.
गेल्या 60 वर्षातील धार्मिक जागृती करत असेल विश्व हिंदू परिषद मठ, मंदिर, आदरणीय स्वामीजी आणि हिंदू समाज यांच्या पूर्ण सहकार्याने समाजात एकोपा प्रस्थापित करणे नेहमीच आवश्यक मानते. लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यासारखे मोठे गुन्हे रोखण्यासाठी आपल्या समाजात जागृती करण्याचे काम सुरू आहे. या सर्व सत्कर्मांच्या षष्ठीपूर्ती निमित्ताने येत्या रविवार दि. 25 ऑगस्ट ते रविवार दि 1 सप्टेंबर 2024 या सप्ताहात 3 वेळा ओंकार, 13 वेळा श्री राम जय राम जय जय राम, तारक मंत्र, शिवाष्टकम स्तोत्र, श्री ललिता सहस्रनाम जप आणि हनुमान चालिसा पठणाचा उपक्रम राबविला जाणार आहे. या षष्ठीपूर्ती कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 25 ऑगस्ट रोजी पूज्य स्वामीजींच्या आशीर्वादाने होणार असून या दिवशी दुपारी 12:30 वाजता 211 जोडप्यांची सत्यनारायण पूजा होईल. विश्व हिंदू परिषद कार्यालय समरसता भवन, बेळगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. पत्रकार परिषदेस वि.हिं.प. जिल्हाध्यक्ष प्रमोदकुमार वककुंदमठ यांच्यासह जिल्हा सचीव आनंद कर्लिंगणावर, नगराध्यक्ष बसवराज भागोजी, नगरसचिव नागेश कांबळे आदी उपस्थित होते.