बेळगाव लाईव्ह : मृत्यू शाश्वत आहे. प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जावेच लागणार आहे. मात्र त्यापूर्वी समाजाची तोडफोड करून, समाजात जातीय दुही पसरवून राजकारणी घाणेरडे राजकारण करत असून राजकारण्यांनी सर्वच गोष्टींचे राजकारण करू नये अशी आर्त मागणी मुत्नाळ येथील कर्नाटक रयत संघाच्या वतीने करण्यात आली.
आज बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना स्मशानभूमीच्या जागेसंदर्भात निवेदन सादर करण्यासाठी आलेले मुत्नाळ येथील कर्नाटक रयत संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सदर मनोगत ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना व्यक्त केले.
दोन वर्षांपूर्वी सौंदत्ती येथील नागरिकांनी थेट मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणून संतप्त आंदोलन केले. या भागात स्मशानभूमीची सोय नसल्याने नागरिकांसमोर अंत्यसंस्कार करण्याची समस्या उभी आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी हि समस्या लक्षात घेऊन त्यांच्या प्रयत्नातून सरकारतर्फे सौंदत्ती येथे स्मशानभूमीची व्यवस्था करून दिली. मात्र काही राजकारण्यांनी यात जातीपातीचे राजकारण आणून विशिष्ट समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याचे घाणेरडे राजकारण केले.
सध्या मुत्नाळ येथील एस. सी. गल्लीतील नागरिकांसाठी स्मशानभूमीची सोय नसल्याने याठिकाणी तात्काळ स्मशानभूमीची सोय उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.