बेळगाव लाईव्ह:पोलीस हे जनतेचे रक्षक असतात मात्र एका पोलिसाने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीला शेडमध्ये कोंडून बेदम मारहाण केल्याची घटना तिकोटा (जि. विजयपूर) येथे नुकतीच उघडकीस आली असून पीडित महिलेने महिला सांत्वन केंद्राच्या मदतीने बेळगाव गाठले आहे.
पीडित महिलेचे नांव प्रतिमा यल्लाप्पा अगसगे (वय 37) असे असून तिला उपचारासाठी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिचा पती यल्लाप्पा अगसगे हा सध्या तिकोटा पोलीस स्थानकात सेवा बजावत आहे. मुळची रायबाग तालुक्यातील निडगुंदी येथील रहिवासी असलेल्या प्रतिमा हिचा 10 वर्षांपूर्वी कुन्नाळ (ता. अथणी) येथील यल्लाप्पा अगसगे या पोलिसाबरोबर विवाह झाला आहे.
या दांपत्याला तीन मुले देखील आहेत. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन यल्लाप्पा याने तिला एका शेडमध्ये कोंडून मारहाण केल्याचा आणि चटकेही दिल्याचा आरोप आहे. कशीबशी पतीच्या तावडीतून सुटका करून घेतलेल्या प्रतिमा हिने महिला सांत्वन केंद्राच्या मदतीने बेळगाव गाठले आहे.
सध्या तिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पतीने चालविलेल्या छळाबद्दल आपण जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे तिने सांगितले आहे.