बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील शिवसेना उ.बा.ठा. गटाचे उपनेते नितीन बानुगडे -पाटील हे येत्या बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी बेळगाव भेटीवर येत आहेत. या दिवशी रात्री 8 वाजता श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगावतर्फे आयोजित अखंड हिंदुस्थान संकल्प दिन सोहळ्यास ते प्रमुख पाहुणे/वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगावतर्फे 14 ऑगस्ट रोजी शहरातील टिळक चौक येथे अखंड हिंदुस्तान संकल्प दिन साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते असलेले नितीन बानुगडे-पाटील हे शिवव्याख्याते म्हणून सुपरिचित असून बऱ्याच वर्षानंतर त्यांचा बेळगावात कार्यक्रम होत आहे.
श्रीराम सेना हिंदुस्तानने ‘चलो टिळक चौक’ अशी हाक दिल्यामुळे बानुगडे -पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी टिळक चौकात अभूतपूर्व गर्दी होणार आहे.
यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा मेळाव्यांसारख्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी नितीन बानुगडे -पाटील बेळगावला घेऊन गेले आहेत. या संदर्भात त्यांच्यावर एक खटला देखील सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आता येत्या बुधवारी टिळक चौकात बानुगडे -पाटील यांच्या स्वरूपात शिवसेनेची तोफ धडाडणार आहे. तेंव्हा अखंड हिंदुस्तान संकल्प दिन सोहळ्यास समस्त मराठी भाषिकांसह देशप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगावने केले आहे.