बेळगाव लाईव्ह:कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी घेतलेला पुढाकार आणि रत्नागिरी -सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी दिलेले आश्वासन यामुळे बेळगाव -चंदगड -सावंतवाडी हा रेल्वेमार्ग लवकरच अस्तित्वात येण्याची आशा निर्माण झाली आहे.
मागील अनेक वर्षांपासून रेंगाळलेले बेळगाव -चंदगड -सावंतवाडी या रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, यासाठी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी अलीकडेच कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेतली होती. त्यांना शाहू महाराजांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लोगोलग रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून या प्रकल्पासाठी त्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. खासदार नारायण राणे यांनी देखील या प्रकल्पासाठी आपले पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन दिले आहे. तसेच आपण संयुक्तपणे रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करू असेही स्पष्ट केले. त्यामुळे हा रेल्वे मार्ग लवकरच अस्तित्वात येण्याची आशा निर्माण झाली आहे. बेळगाव -चंदगड -सावंतवाडी या 114 कि.मी. अंतर असलेल्या रेल्वे मार्गाचे पहिले सर्वेक्षण 1970 रोजी झाले होते. त्यानंतर 2018 मध्ये नैऋत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाचा पुन:सर्वेक्षण करून आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सुपूर्द केला होता. मात्र त्यानंतर योग्य पाठपुरावा झाला नसल्याने हा रेल्वे मार्ग प्रस्ताव रेंगाळला असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांनी दिली.
बेळगाव, कुद्रेमनी, माडवळे, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, कानूर, आंबोली मार्गे सावंतवाडी असा हा रेल्वेमार्ग आहे. बेळगाव -सावंतवाडी मार्गाने दक्षिण रेल्वे आणि कोकण रेल्वे जोडली जाणार आहे. बेळगाव भागातील भाजीपाला कोकण -गोव्यात तर कोकणातील मासे उत्तर कर्नाटकासह पश्चिम महाराष्ट्रात पोहोचण्यास मदत होणार आहे.
बेळगावचे भाजप खासदार जगदीश शेट्टर यांनीही या कमी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगाव शहराला कोकणापासून रेल्वे मार्गांनी जोडण्यास मदत होणार आहे या अगोदर बेळगाववर कोंकण बाजारपेठेसाठी अवलंबून आहेत मात्र हा नवीन रेल्वे मार्ग झाल्यास बेळगाव कोकणाचे संबंध पुन्हा वृद्धिंगत होणार आहेत. त्यामुळे बेळगावच्या खासदारांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
या मार्गात बेळगाव, चंदगड, आंबोलीसह एकूण 9 रेल्वे स्थानके (स्टेशन्स) निश्चित केली आहेत. या रेल्वे मार्गाचा अपेक्षित खर्च 1805.09 कोटी रुपये असून निश्चितच तो भारतीय रेल्वेला परवडणारा आहे. या रेल्वे मार्गामुळे होणारा आणखी एक प्रमुख लाभ म्हणजे जेंव्हा कधी कोकण रेल्वेच्या मार्गात दरडी कोसळून मार्ग बंद पडतो, त्यावेळी कोकण रेल्वेची वाहतूक बेळगाव मार्गे वळविता येणे शक्य होणार आहे.
याखेरीज सध्याचे बेळगावहून खानापूर, लोंढा, कॅसलरॉक, मडगाव, करमळी, पेडणे मार्गे सावंतवाडी हे अंतर 279 कि.मी. आहे. बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्ग झाल्यास हे अंतर 114.60 कि.मी.ने कमी होऊन 165 कि.मी. इतके होईल म्हणजे सध्यापेक्षा रेल्वे मार्गाने बेळगावला सावंतवाडी जवळ होणार आहे असा सकारात्मक अहवाल बेंगळूरचे मुख्य अभियंते राम गोपाल यांनी रेल्वे मंत्रालयास पाठवला आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होणाऱ्या खासदारांनी बेळगाव आणि सिंधुदुर्गच्या खासदारांच्या मदतीने स्वतः नेतृत्व करून बेळगाव -सावंतवाडी रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यामुळे चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील तसेच कोकणातील चौकुळ आणि आंबोली भागातील लोक रेल्वेच्या कक्षेत येतील.
या भागातील प्रवासी पंढरपूर, मुंबईला रेल्वेने जाऊ शकतील. त्यामुळे या भागाच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल. स्वातंत्र्यानंतरही रेल्वेच्या प्रतीक्षेत दिवस कंठणाऱ्या वंचित भागाच्या विकासाची परिमाणे बदलू शकतील. खासदार श्रीमंत शाहू महाराजांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करू असे आश्वासनही दिले आहे.