बेळगाव लाईव्ह:बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील सर्व निवासी क्षेत्रे बेळगाव महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची शिफारस खासदार जगदीश शेट्टर आणि इराण्णा कडाडी यांनी केली आहे. त्या अनुषंगाने तपशीलवार माहिती गोळा करून सुधारित प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश खासदार आणि बीसीआरडब्ल्यूए च्या सदस्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले.
बैठकीतील चर्चेतून बंगलो एरिया आणि मिलिटरी स्टेशनचे इतर पूर्वेकडील भाग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव या प्रस्तावात असू शकतो असे सूचित करण्यात आले. पश्चिम बाजूने लष्करी स्थानक राखून ठेवण्याची अपेक्षा आहे, तर पूर्वेकडील बाजू नागरी प्रशासनाकडे सोपवली जाऊ शकते. हे बदल दर्शविणारा नवीन प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी पाठवला जाईल. प्राथमिक चर्चेत छावणीच्या पश्चिमेला लष्करी स्थानक स्थापन करण्यावरही भर देण्यात आला. पुनर्वाटपाचा एक भाग म्हणून बी-4 जमीन कॅन्टोन्मेंट परिसरातील 96 एकरमध्ये पसरलेल्या मिलिटरी डेअरी फार्मच्या बदल्यात कॅन्टोन्मेंटला दिली जाऊ शकते. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तपशीलवार सांगताना जिल्हा प्रशासनाने 928 एकर लष्करी जमीन महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच तयार केला आहे. अधिक सखोल चर्चेनंतर हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे सादर करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवला जाईल, असे स्पष्ट केले.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड सध्या एकूण 1,763 एकर क्षेत्राचे व्यवस्थापन करते. त्यापैकी बोर्डाने 112 एकर जमीन हस्तांतरणासाठी आधीच मंजूर केली आहे. या बैठकीला आमदार असिफ सेठ, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि डिफेन्स इस्टेटचे विविध अधिकारी यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत खासदार शेट्टर यांनी निवासी क्षेत्रे, विशेषत: जी सरकारी कार्यालये आणि बंगले आहेत ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
दरम्यान, जिल्हाधिकारी रोशन यांनी सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रांची कसून पडताळणी आणि चर्चा केल्यानंतर प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आवाहन केले. डिफेन्स इस्टेट ऑफिसर (डीईओ) यांनी त्वरीत प्रस्ताव सादर करण्याची गरज अधोरेखित करताना प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे संरक्षण मंत्रालय अंतिम निर्णय घेईल, असे सांगितले.
यावेळी 96 एकर डेअरी फार्मच्या शेतजमिनी वापराविना राहिल्यास त्यांचा पुनर्वापर करण्याबाबतही मत व्यक्त करण्यात आले. बैठकीत बेळगाव कॅन्टोन्मेंट रहिवाशी कल्याण संघटनेचे प्रतिनिधीत्व डॉ. नितीन खोत आणि रंजन शेट्टी यांनी केले.