बेळगाव लाईव्ह :तब्बल 24 वर्षानंतर प्रथमच खानापूर तालुक्यातील नंदगड गावाची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव पुढील वर्षी दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केला आहे. सदर यात्रेचा पहिला धार्मिक विधी समजला जाणारा देवीला रेडा सोडण्याचा कार्यक्रम आज मंगळवारी मोठ्या भक्तीभावाने उत्साहात पार पडला.
यात्रोत्सव कमिटीने आवाहन केल्यानुसार आजच्या रेडा सोडण्याच्या धार्मिक कार्यक्रमात समस्त नंदगडवासीय सहभागी झाले होते. यावेळी देव देवतांना गाऱ्हाणे घालून देवीला रेडा सोडण्यात आला. सदर वाद्यांच्या गजरात पार पडलेल्या धार्मिक विधीमध्ये गावातील सुहासिनी महिला डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. या पद्धतीने 6 महिने आधी यात्रोत्सवपूर्व कार्यक्रमांना आज मोठ्या भक्तीभावाने उत्साही वातावरणात प्रारंभ करण्यात आला. आता येत्या दोन दिवसात देवीचा रेडा मानकऱ्यांची भेट घेणार आहे.
तब्बल 24 वर्षानंतर प्रथमच होणारी ही श्री महालक्ष्मी यात्रा भव्य प्रमाणात साजरी केली जाणारा असून यात्रेच्या निमित्ताने पुढील 6 महिने विविध वार पाळले जाणार आहेत.
तसेच या कालावधीत समस्त गावकरी भक्तांच्या उपस्थितीत गोंधळ घालणे वगैरे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रेदिवशी म्हणजे पुढील वर्षी 12 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचे अक्षता रोपण व अन्य महत्त्वाचे धार्मिक विधी होणार आहेत. अक्षता रोपणाचा विधी सलग अकरा दिवस चालणार आहे.
नंदगडची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे अक्षता रोपणानंतर देवीचे गावभर भ्रमण होऊन पाचव्या दिवशी ती गदगेवर स्थानापन्न होणार आहे. तत्पूर्वीचे चार दिवस ती गावात ठीकठिकाणी वस्तीला राहणार असून या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांसह इतर कार्यक्रम होणार आहेत.