बेळगाव लाईव्ह :मुस्लिम धर्मगुरू बाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या रामगिरी बाबा यांच्यावर एफआयआर दाखल करून कारवाई केली जावी, अशी मागणी बेळगाव येथील मुस्लिम धर्मगुरू आणि मुस्लिम वकील संघटनेने शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांकडे केली आहे.
बेळगाव येथील मुस्लिम धर्मगुरू आणि मुस्लिम वकिलांच्या शिष्टमंडळाने आज बुधवारी शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग आणि पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन त्यांना उपरोक्त मागणीची निवेदन सादर केले. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मुस्लिम धर्मगुरू म्हणाले की, आपल्या देशात हिंदू, मुस्लिम, शिख व ख्रिश्चन धर्माचे लोक हजारो वर्षापासून प्रेमाने गुणागोविंदाने एकत्र राहत आलो आहोत.
मात्र अलीकडच्या काळात काही विघ्न संतोषी जातीयवादी लोक देशातील सौहार्द, शांतता, सुरक्षा आणि बंधुभाव नष्ट करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान, केंद्र सरकार आणि देशातील शांतता प्रिय करोडो हिंदू बांधवांना तसेच मुस्लिमेतर जाती-धर्माच्या लोकांना आमची विनंती आहे. आम्हा धर्मगुरूंच्या बाबतीत जो मुद्दा उपस्थित झाला आहे,
त्यामध्ये त्यांनी अग्रेसर रहावे. देशातील सौहार्द, शांतता, सुरक्षा आणि बंधुभाव नष्ट करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र संघटितपणे उभे ठाकूया आणि आपला देश चिरकाल प्रेम, बंधुभाव, शांती, सौहार्द यांचा कैवारा राहील याची काळजी घेऊया असे आवाहन करून आजपर्यंत आपण एकमेकांसोबत गुणागोविंदाने रहात आलो आहोत तसेच यापुढेही राहूया, असे धर्मगुरूंनी स्पष्ट केले.
मुस्लिम वकिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना स्वामी रामगिरी बाबा यांनी आमच्या नबींचा अपमान केला आहे. कोणत्याही धर्माचा धर्मगुरू या पद्धतीने इतर धर्माच्या धर्मगुरूचा अपमान करत नाही. त्यामुळे रामगिरी बाबा यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यांनी हा अपमान का? कशासाठी केला? हे पोलीस तपासात समोर येईलच.
हे एफआयआरचे प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून घ्यावा. कारण या पद्धतीचे एफआयआर महाराष्ट्र, मध्य प्रदेश वगैरे ठिकाणी झालेले आहेत. कर्नाटकातही तो झाला पाहिजे आणि बेळगाव जिल्ह्यात तशी मागणी आम्ही पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांकडे केली आहे. तांत्रिक गोष्टी सुस्पष्ट करून आम्ही निश्चितपणे एफआयआर दाखल करू असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे. हा एफआयआर झालाच पाहिजे अन्यथा अशा निंद्य प्रकारांना आणखी प्रोत्साहन मिळेल. रामगिरी बाबांचे वक्तव्य हे जातीय भावना दुखावणारे आहे. त्यामुळे मुस्लिम समुदाय दुखावला गेला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी रामगिरी बाबांना पाठीशी घालणे चुकीचे आहे. या बाबांसारखे लोक देशातील शांतता आणि बंधुभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत असे सांगून तेंव्हा देशातील बंधुभाव, प्रेम, शांतता, सलोखा अबाधित राखण्यासाठी जनतेने देखील अशा लोकांना जास्त किंमत देऊ नये, असे आवाहन मुस्लिम वकिलांनी केले.