बेळगाव लाईव्ह :मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आणि दहीकाला आज सोमवारी अपूर्व उत्साहात भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
मिलिटरी महादेव मंदिर येथे मध्यरात्रीच्या सुमारास भगवान कृष्णाच्या जन्म सोहळ्याने या उत्सवाची सुरुवात झाली आणि शेवटी रेजिमेंटल सेंटर येथे उत्साही दहीकाला अर्थात दहीहंडी कार्यक्रमाने उत्सवाचा समारोप झाला.
उंचावर लटकवलेले दह्याने भरलेले मडके फोडण्याच्या दहीहंडी कार्यक्रमात मराठा सेंटर मधील जवानांच्या विविध तुकड्यांचा सहभाग होता. चार-पाच थरांचा मानवी मनोरा बनवून उंचावरील दहीहंडी फोडण्यासाठी जवानांनी चालविलेल्या प्रयत्नांमुळे यावेळी जोशपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळत होते. दहीहंडीत सहभागी जवान समन्वय साधत उंच मानवी मनोरा तयार करून आपल्या शारीरिक पराक्रम आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना पाहणे हे एक आनंददायक दृश्य होते.
या पारंपारिक उत्सवाने सैनिकांना एकत्र आणून एकता आणि सौहार्द यांचे दर्शन घडवले. ज्याने भारतीय सैन्याला एकसंध ठेवणाऱ्या खोल सांस्कृतिक मुळांना बळकटी दिली.
कृष्ण जन्माष्टमी सारखे सण केवळ आपल्या परंपरेचा सन्मान करत नाहीत तर सैनिकांमध्ये अभिमान आणि आपुलकीची भावना देखील वाढवतात. देशातील परंपरा आणि कर्तव्य यांच्यातील बंध दृढ राहतील याची खात्री करून देशाच्या विविध सांस्कृतिक पद्धतींबद्दल एकता आणि आदराची भावना जोपासण्याचे प्रयत्न करण्यात भारतीय सैन्य ठाम आहे.