बेळगाव लाईव्ह : बेळगावातील सार्वजनिक गणेश मंडळांना महाराष्ट्रा प्रमाणे पुढील पाच वर्षाची ही परवानगी द्यावी जेणेकरून मंडळांना पळापळीचा त्रास होणार नाही. याबाबत प्रशासनाशी पाठपुरावा करण्याचा निर्णय शहापूर विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव होते. दरवर्षी परवानगी मिळवण्यासाठी मंडळांना हेलपाटे मारावे लागतात ते त्रास कमी व्हावे यासाठी पाच वर्षाची परवानगी प्रशासनांना गणेश मंडळांना एकदाच द्यावी याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
गणेश उत्सव कार्यकाळात गणेश मंडळांना ज्या समस्या उद्भवतात त्याची सर्व जाणीव जिल्हा प्रशासनांना देण्यात यावी अशी ही चर्चा या बैठकीत झाली. विशेषता जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून गणेश उत्सव मिरवणूक मार्गात असलेले रस्त्यावरील खड्डे बुजवणे लोंबकळलेल्या विद्युत तारा आणि इतर समस्या सोडवून घेण्याबाबत ही निर्णय झाला. दरवर्षी हेस्कॉम कडून गणेश मंडळांना देण्यात येणारे बिल त्यावरून उद्भवणाऱ्या समस्या याचीही जाणीव प्रशासनाला करून देण्यात येणार आहे.
गेल्या अठरा वर्षापासून शहापूर विभाग मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या अध्यक्षपदी कार्यरत असलेले नेताजी जाधव यांनी पुढील तीन वर्षे देखील अध्यक्षपद सांभाळावे असा ठराव करण्यात करून त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली.
यावेळी श्रीधर तिगडी, अशोक होसमनी,राजकुमार बोकडे, प्रशांत भातकांडे,बापू जाधव अमृत भाकोजी,राजू बिर्जे,रमेश सोंटक्की,नगरसेवक नितीन जाधव, रवी साळुंके,रणजित हावळाणाचे, हिरालाल चव्हाण,अनिल आमरोळे,तानाजी शिंदे यांनी बैठकीत विचार मांडले.यावेळी अशोक चिंडक , राजू सुतार, राव बहादुर कदम,पी जे घाडी, सुधीर कालकुंद्रीकर आडी मोठ्या संख्येने गणेश भक्त मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.