बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य एस.के. वंटिगोडी यांच्या अध्यक्षतेखाली आज मानवाधिकार आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत नावगे गावातील स्नेहम कारखान्याला लागलेल्या आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे अवशेष सन्मानपूर्वक हस्तांतरित करण्यात आले नसल्याच्या वृत्ताबाबत बोलताना ते म्हणाले, सदर कामगाराच्या मृतदेहाचे अवशेष सन्मानपूर्वक सोपविण्यात आले असून आगामी काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले.
आगीची दुर्घटना घडलेल्या नावगे गावातील स्नेहम कारखान्याला भेट देऊन पाहणी केल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कर्नाटक राज्य मानवाधिकार आयोगाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्यांनी ते बोलत होते.
नावगे गावातील स्नेहम कारखान्याला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेबाबत वृत्तपत्रांतून वेगवेगळी मते प्रसिद्ध झाली आहेत. या संदर्भात मानवाधिकार आयोगाच्या सविस्तर अहवालाच्या आधारे आढावा घेण्यात येत आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी गाफील न राहता स्पष्ट अहवाल सादर करावा, असे ते म्हणाले.
भविष्यात अशी प्रकरणे पुन्हा घडू नयेत. रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह मृताच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात यावा. अशा वेळी कर्तव्यासोबत माणुसकीही विसरता कामा नये. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मृतदेह ताब्यात द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामगारांना आवश्यक संरक्षक उपकरणे पुरविली जातात की नाही हे तपासावे. आपत्कालीन वैद्यकीय उपचार देण्यासाठी मेड किट अनिवार्य असावी आणि कामगार जखमी झाल्यास त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी वाहन व्यवस्था असावी. कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतत तपासणी करावी. त्यामुळे संभाव्य आपत्ती टाळता येऊ शकते, असे वंटीगोडी यांनी सांगितले. साखर कारखान्यांतील कामगारांची गैरसोय होते, हेही तपासून पाहावे. दु:खद घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. याबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना निर्देश द्यावेत. ते म्हणाले की, जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करावेत.
संबंधित अधिकाऱ्यांनी आगीच्या आपत्तीची स्पष्ट चौकशी करावी. असे प्रकार घडल्यास तालुका अधिकारी व पोलीस खाते थेट जबाबदार असते. त्यामुळे मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात यावा. मानवाधिकारांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विविध विभागांच्या वसतिगृहांमध्ये अधिकारांचे उल्लंघन होत असल्यास तत्काळ तक्रारी कराव्यात. मानवी हक्क उल्लंघनाची बहुतांश प्रकरणे बस स्टँड, वसतिगृहे आणि पोलिस स्टेशन यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी घडतात. प्रकरणांची माहिती आल्यास संबंधित तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तातडीने कार्यवाही करावी, आगामी काळात मानवाधिकार आयोगामार्फत राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. विविध विभागांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य एस.के. वंटिगोडी यांनी दिली.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, बेळगावचे उपविभागीय अधिकारी श्रवण नायक, बेळगाव तहसीलदार बसवराज नगराळ, जिल्हा औद्योगिक केंद्राचे सहसंचालक सूर्यनारायण भट, पोलीस विभाग, कामगार विभाग, अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते.