बेळगाव लाईव्ह :पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी.
तसेच महिला डॉक्टरांना संरक्षण मिळावे, या मागणीसाठी बेळगावातील वैद्यकीय महाविद्यालयांचे डाॅक्टर्स, पीजी डाॅक्टर्स आणि विद्यार्थी -विद्यार्थिनींनी आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले.
कोलकाता येथे वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर पाशवी बलात्कार करून तिचा खून करण्याच्या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. सदर घटनेच्या निषेधार्थ बेळगावातील वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थी -विद्यार्थिनी आज रस्त्यावर उतरले होते.
मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येत जमलेल्या या संतप्त विद्यार्थी -विद्यार्थिनींनी जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडला होता. निदर्शने करणाऱ्या विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या हातातल निषेधाचे आणि अत्याचारग्रस्त मयत महिला डॉक्टरला न्याय देण्याच्या तसेच डॉक्टर्सना संरक्षण देण्याच्या मागणीचे फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
निदर्शने केल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर त्या निंद्य घटनेचा आपणही निषेध करतो असे सांगून प्रशासनाची बाजू मांडली. तसेच डॉक्टर्सना संरक्षण देण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील असे आश्वासनही दिले.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे कोलकात्ता येथील प्रकरणाची जलद चौकशी करून आरोपीला कठोर शासन करावे. या पद्धतीने पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देतानाच नुकसान भरपाईही द्यावी. डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आजच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या डॉक्टरांनी कोलकता येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरण असले पाहिजे ते नसेल तर डॉक्टर काम करू शकणार नाही आणि त्यांनी काम थांबवले तर समाजाचे आरोग्य धोक्यात येईल. डॉक्टरांना गृहीत धरणे बंद करा. ज्या महिला डॉक्टर वर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली तिच्या कुटुंबीयांवर काय प्रसंग उडवला असेल याचा विचार करा. सरकारने अशा घटना भविष्यात घडणार नाहीत याची दक्षता घेऊन डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरणाची निर्मिती करावी.
महिला डॉक्टराच्या निघून बलात्कार व हत्येचे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे देण्यात यावे असा कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेला आदेश स्वागतारह आहे तेव्हा या प्रकरणाची युद्ध पातळीवर चौकशी पूर्ण करून आरोपीला कठोरात कठोर शासन द्यावे.
न्यायाला विलंब याचा अर्थ न्याय नाकारणे असाच होतो तेव्हा असे होऊ न देता अत्याचारग्रस्त मयत महिला डॉक्टरला न्याय द्यावा, असे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. आजच्या या आंदोलनात जे. एन, मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स, पीजी डॉक्टर, विद्यार्थी -विद्यार्थिनी, बीम्सचे डॉक्टर्स बहुसंख्येने सहभागी झाले होते.