बेळगाव लाईव्ह:महिनाभरापूर्वी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कित्तूर (जि. बेळगाव) जवळ महामार्गावरील दरोड्यासाठी जबाबदार असलेल्या एका दरोडेखोर टोळीतील 4 जणांना मथुरा पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी कर्नाटकातील एका स्टील व्यावसायिकाकडून 10 लाखांहून अधिक रुपये घेऊन फरार झाली होती. अटकेदरम्यान जैंत पोलिस स्टेशन आणि एसओजी पथकाच्या पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत दोन संशयितांच्या पायात गोळी लागली असून अटक केलेल्या चौघांनाही बुधवारी कारागृहात धाडण्यात आले.
पोलिसांनी अटक केलेल्या संशयतांची नावे हिरानाथ (रा. भाडोवास, बिकानेर), रवी उर्फ रवींद्र (रा. गोपालनगर हायवे, मथुरा), लक्ष्मणनाथ (रा. बिंदेसार चुरू, राजस्थान) आणि राहुल (रा. कामई, बरसाना, मथुरा) अशी आहेत. बेळगावहून शिमोगा येथे जाणाऱ्या नेक्सॉन कारला (क्र. केए 17 एमए 1992) अडवून 10 लाख रुपये लुटल्याची घटना 30 जून रोजी सकाळी 6:30 ते 7:00 च्या दरम्यान घडली होती. दरोडा टाकताना सुनील प्रजापत आणि श्रीचंद या पीडितांना मारहाण करण्यात आली. या संदर्भात 3 जुलै रोजी कित्तूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. एसएसपी शैलेश कुमार पांडे यांनी कळवले की, महामार्गावर सशस्त्र गुन्हेगार घेऊन जात असलेल्या नंबर प्लेट नसलेल्या कारची माहिती मिळाल्याने रामताल रोडपासून देवी अटास बंबा रोडवर पोलिसांनी नाकाबंदी केली. पोलिसांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता, गुन्हेगारांनी गोळीबार केला. परिणामी कार मधील दोघांच्या पायात गोळी लागली तर उर्वरित दोन संशयितांना शिताफिने पकडण्यात आले. पोलिसांनी कारमधून 4 पिस्तूल, 9 काडतुसे आणि 10.35 लाख रुपये जप्त केले आहेत. हिरानाथ, रवी उर्फ रवींद्र, लक्ष्मणनाथ आणि राहुल अशी आरोपींची नावे आहेत. चकमकीत हिरानाथ आणि रवी यांच्या पायाला गोळी लागून दुखापत झाली आहे.
सदर चार संशयितांनी कित्तूरजवळ दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कित्तूर पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहेत. जप्त केलेले 10 लाख 35 हजार रुपये या टोळीने 30 जूनच्या दरोड्यावेळी अलवर, राजस्थान येथून धर्मेंद्र उर्फ कुल्ली आणि अरुण (दोघे रा. मथुरा) तसेच भगवान शाह (रा. अलवार राजस्थान) या आपल्या सहकाऱ्यांसमवेत घेतल्याचा आरोप आहे.
एसएसपी पांडे यांनी सांगितले की, कर्नाटक पोलिसांना अटकेबाबत माहिती देण्यात आली आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी एसओजी आणि जैन पोलिसांच्या पथकाला 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून लवकरच आणखी एक पथक मथुरेला रवाना होणार आहे. पोलिसांनी संशयितांकडून 10 लाख रुपये, एक गावठी पिस्तूल आणि 16 काडतुसे जप्त केली आहेत.