बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील मुंबई – पुणे शहरानंतर श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची भव्य परंपरा बेळगावमध्ये चालत आली असून गणेशोत्सवादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीसंदर्भात तसेच विसर्जन मिरवणुकीतील नियोजनासंदर्भात आज विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मार्केट पोलीस स्थानकात बैठक बोलाविण्यात आली होती.
७० हुन अधिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्केट पोलीस स्थानकाचे निरीक्षक एम. के. धामण्णावर, उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नावार यांच्या नेतृत्वाखाली हि बैठक पार पडली. बेळगावमध्ये आयोजिण्यात येणारी विसर्जन मिरवणूक वेळेत सुरु करून वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. याचसंदर्भात योग्य नियोजन करण्यासाठी विभागनिहाय बैठकांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
बेळगावमध्ये ३५० हुन अधिक सार्वजनिक मंडळे आहेत. प्रत्येक गल्लीत उभारण्यात येणाऱ्या श्री गणेशोत्सव मंडपांमुळे, स्वागतकमानीमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी अशी सूचना पोलीस निरीक्षक एम. के. धामण्णावर यांनी केली. तसेच ज्या मंडळांकडे परवाने नाहीत, त्या मंडळांसाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात येणार असून सार्वजनिक मंडळांना आणखीन कोणत्या समस्या वा अडचणी असल्यास त्याची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित महामंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची डागडुजी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था तसेच आवश्यक त्या सर्व संरक्षक उपाययोजना राबविण्यात याव्यात, विशेषतः महिलांसाठी सुरक्षा यंत्रणा पुरविण्यात यावी, हेस्कॉम, वाहतूक, परिवहन यासारख्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाने सहकार्य करावे, परगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना केल्या.
या बैठकीला शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सुनील जाधव, विजय जाधव, राजकुमार खटावकर संतोष कणेरी, जोतिबा पवार, संजय नाईक, विनायक बावडेकर, अरुण पाटील, इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते.