Thursday, January 2, 2025

/

नियोजित तानाजी गल्ली रेल्वे गेट उड्डाणपुलाला तीव्र विरोध

 belgaum

बेळगाव लाईव्ह :प्रशासनाकडून शहरातील तीन उड्डाणपूलांमागोमाग आता तानाजी गल्ली रेल्वे गेटच्या ठिकाणी चौथा उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. तथापि नियोजित उड्डाणपुराला तानाजी गल्ली परिसरातील लोकांनी तीव्र विरोध केला असून यासंदर्भात ते जिल्हाधिकारी आणि खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन मागणी करणार आहेत.

तानाजी गल्ली ते फुलबाग गल्ली दरम्यानच्या रेल्वे गेटच्या ठिकाणी उड्डाणपुलासाठी रेल्वे खात्याने सर्वेक्षण सुरू केले आहे. तथापि तानाजी गल्ली महाद्वार रोड परिसरातील जनतेने कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा उड्डाणपूल होऊ देणार नाही असा ठाम निर्धार केला आहे.

या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हने आज सकाळी तानाजी गल्ली परिसरातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी बोलताना दुकानदार शिवानंद पाटील यांनी कपिलेश्वर आणि जुना धारवाड रोड येथे उड्डाणपूल असल्यामुळे या ठिकाणी खरं तर उड्डाणपूलाची गरजच नाही असे सांगितले. हा रस्ता लहान आहे आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीही नसते त्यामुळे येथे पुलाची गरज नाही. वाटल्यास गेटच्या ठिकाणी भिंत घालावी परंतु आम्हाला उड्डाणपूल नको असेही त्यांनी स्पष्ट केले.

अन्य एका रहिवाशांने सांगितले की गेल्या दोन दिवसापासून तानाजी गल्ली व महाद्वार रोड परिसरात नियोजित उड्डाणपुलाबाबतची चर्चा सुरू आहे. त्याबद्दल आम्ही बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो की, सध्या बेळगावमध्ये धारवाड रोड, कपिलेश्वर रोड आणि टिळकवाडीतील तिसरे रेल्वे गेट येथील उड्डाणपूल असो. त्यांची कामे अर्धवट आहेत आणि संबंधित उड्डाणपुलांमुळे अनेक जणांचे आर्थिक नुकसान होऊन ते देशोधडीला लागले आहेत. ती परिस्थिती तानाजी गल्ली, महाद्वार रोड आणि पलीकडील फोर्ड रोडच्या नागरिकांवर ओढवू नये यासाठी रेल्वे प्रशासन स्थानिक प्रशासन आणि महापालिकेला तानाजी गल्ली महाद्वार रोड येथील समस्त नागरिकांची विनंती आहे की. हा उड्डाणपूल न बांधता त्याऐवजी पर्यायी व्यवस्था करावी. कपिलेश्वर रोड येथील उड्डाणपुलामुळे तेथील व्यापारी, दुकानदारांचे नुकसान होऊन त्यांचे उच्चाटन झाले आहे. त्याचप्रमाणे तानाजी गल्लीच्या पलीकडे जो छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल आहे. त्याच्याखाली मोठी बाजारपेठ, ऑटोमोबाईल लाईन होती जी त्या उड्डाण पुलामुळे संपूर्ण नष्ट झाली आहे. तेथील व्यापारी व व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन ते स्थलांतरित झाले आहेत.Tanaji galli rob

स्थानिक रहिवासी व घरमालकांचे नुकसान होऊन तेथील सर्व व्यवहार बंद झाले आहेत. आता या ठिकाणी उड्डाणपूल उभारल्यास येथे देखील तीच परिस्थिती उद्भवणार यात तीळ मात्र शंका नाही. यासाठी येथे आम्हाला उड्डाणपूल नको, त्याऐवजी प्रशासनानेच वेगळा पर्याय काढावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

अनिल लक्ष्मण देसाई यांनी यावेळी बोलताना सांगितले की रेल्वेचे नागराज नावाचे अधिकारी पुलासाठी मोजमाप करून गेले आहेत. त्यामुळेच आम्हाला या ठिकाणी उड्डाणपूल होणार याची माहिती मिळाली आहे. तथापि तानाजी गल्ली रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूला जवळपास 200 मीटर अंतरावर दोन उड्डाणपूल आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत सुरू आहे. त्यामुळे पुन्हा या ठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात शहाणपणा नाही. यामुळे परिसरातील लोकांचे आर्थिक नुकसान होणार असून कोणाला काहीच फायदा होणार नाही. तेव्हा दोन्ही बाजूला पूल असल्यामुळे हे तानाजी गल्ली रेल्वे गेट बंद करून या ठिकाणी पलीकडे ये -जा करण्यासाठी उड्डाण पदपथ उभारण्यात यावा, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.

महाद्वार रोड येथील अनिल चव्हाण -पाटील यांनी नियोजित उड्डाणपुलामुळे आमच्या घरांचे नुकसान होणार असल्यामुळे आम्हाला हा पुल नको आहे असे सांगितले. सदर पुलामुळे सर्वांना त्रास होणार असल्यामुळे काल झालेल्या आमच्या पंचमंडळी, युवक मंडळं व नागरिकांच्या बैठकीत खासदार जगदीश शेट्टर यांना भेटून नियोजित उड्डाण पुलाच्या विरोधात निवेदन देण्याचे ठरले आहे तसेच आज सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्याद्वारे नियोजित उड्डाणपूल आमच्यासाठी किती प्रतिकूल आहे याची माहिती देणार आहोत, असे चव्हाण -पाटील यांनी स्पष्ट केले. अन्य रहिवासी बंडू भातकांडे यांनी सदर उड्डाणपूलामुळे तानाजी गल्लीचा संपूर्ण नायनाट केल्या प्रमाणे होणार असल्यामुळे आमचा या पुलाला तीव्र विरोध असल्याचे सांगितले.

संजय प्रकाश पावशे यांनी यावेळी बोलताना या उड्डाणपुलाची निर्मिती करून प्रशासन नेमके काय साध्य करणार आहे? असा सवाल केला. तसेच प्रशासनाने प्रथम यापूर्वी तयार करण्यात आलेल्या उड्डाणपूलांच्या समस्या मार्गी लावाव्यात आणि त्यानंतर या उड्डाण पुलाचा विचार करावा. सदर उड्डाणपूल उभारण्याच्या आधी येथील लोकांचा प्रथम विचार केला जावा आणि त्यांच्यासाठी चांगला पर्याय तयार ठेवावा असे पावशे यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.