बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी व्यापक उपाययोजना कराव्यात. तसेच हलशी येथील सब स्टेशन सत्वर कार्यान्वित करावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने हेस्कॉमकडे करण्यात आली आहे.
खानापूर तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यानी आज गुरुवारी खानापूर हेस्कॉमचे नूतन सहाय्यक कार्यकारी अभियंता जगदीश मोहिते यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले.
यावेळी अध्यक्ष गोपाळ देसाई अधिकाऱ्यांना माहिती देताना म्हणाले की, पावसाला सुरुवात झाल्यानंतर वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण यंदा वाढले आहे. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यासाठी पावसाला सुरुवात झाल्यानंतर वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना वीज पुरवठा खंडित झाल्यास अडचणींचा सामना करावा लागतो.
त्यामुळे जंगल भागातील वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी योग्य प्रकारे आराखडा तयार करून वीज वाहिन्या घालाव्यात.
तालुक्याच्या कोणत्याही भागातील वीज पुरवठा अधिक दिवस बंद राहणार नाही यासाठी हेस्कॉमने प्रयत्न करावेत. तसेच वादळी वारा आणि पावसामुळे ट्रान्सफॉर्मर आणि वीज तारांचे नुकसान होऊ नये यासाठी पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच काळजी घ्यावी, अशी मागणी देसाई यांनी केली.
सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी खानापूर तालुक्यातील नागरीक नेहमीच हेस्कॉमला सहकार्य करीत आले आहेत. तेंव्हा हेस्कॉमने कारणे न देता नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावे. खानापूर तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे अडचण निर्माण होत असली तरी तेथील वीजपुरवठा सातत्याने खंडित होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले. निरंजन सरदेसाई यांनी बोलताना खानापूर तालुक्यात अनेक जण उद्योगधंदे सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
मात्र वीज पुरवठ्याची समस्या असल्यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी अडचण येत आहेत असे स्पष्ट करून येत्या काळात उद्योग धंदे सुरू करण्यासाठी विजेचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सरदेसाई यांनी केली.
सहाय्यक कार्यकारी अभियंता जगदीश मोहिते यांनी समिती पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. “मी कांही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे या भागातील समस्यांची संपूर्ण माहिती मला नाही. तथापी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित समस्यांचे निवारण करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.
कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे कांही प्रमाणात अडचणी येत आहेत. हेस्कॉमच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी खानापूर तालुक्याला भेट देऊन येथील परिस्थितीची माहिती घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या भागातील समस्या दूर होतील”, असे आश्वासन मोहिते यांनी दिले आहे. याप्रसंगी मुकुंद पाटील, राजाराम देसाई आदी उपस्थित होते.