बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील खादरवाडी येथील बकाप्पा वारीची जमीन चोरीला गेल्याची तक्रार करत आज शेकडो ग्रामस्थांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करत निवेदन सादर केले. येथील ग्रामस्थांना खोटी नोटीस देऊन चुकीच्या पद्धतीने व जबरदस्तीने शेतकऱ्यांची जमीन दुसऱ्याला विकण्यात आली असून, जप्त केलेली जमीन परत न केल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
आज खादरवाडी येथील ग्रामस्थांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. याबाबत अधिक माहिती अशी कि, खादरवाडी गावात सुमारे आठ हजार शेतकरी राहतात. या गावात त्यांची 350 एकर जमीन असून यातील 156 एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधितांकडे विचारणा केली असता दबाव आणून मूळ जमीन मालकांवर अत्याचार करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे शिवाय जमीन मालकांना धोका असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सदर जमिनीच्या संगणकीकृत उताऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावाऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे नाव नमूद करण्यात आले असून खोट्या नोटीस देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
जमीन संपादनादरम्यान प्रति एकर १३ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आश्वासन बुडाने दिले होते. मात्र आता त्याच जमिनी तब्बल १ कोटी ८ लाख रुपयांना दुसऱ्यालाच विकण्यात आल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांची अशापद्धतीने फसवणूक करून दिशाभूल करण्यात आली असून आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात अन्यथा सामूहिक आत्महत्या करण्यात येतील, असा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला.
याप्रकरणी १८ पंचानीदेखील वरिष्ठ पातळीवर हालचाली गतिमान केल्या असून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुडा च्या नावे शेतकऱ्यांना खोट्या नोटीस बजावण्यात आल्या असून याप्रकरणात एका लोकप्रतिनिधीचाही वरदहस्त लाभल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शेतकऱ्यांसोबत झालेल्या या अन्यायाविरोधात आंदोलन करण्यात येत असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी यावेळी केली.
गेल्या ८ महिन्यांपूर्वी खादरवाडी येथील बकाप्पा माळ जमिनीसंदर्भात शेतकऱ्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. यावेळीदेखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेदून निवेदन सादर केले होते. मात्र अद्याप हा प्रश्न सोडविण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी प्रशासन आणि पोलीस विभागाने आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा सामूहिक आत्महत्या करू असा इशारा दिला आहे.