Thursday, September 19, 2024

/

खासदारांचा भूसंपादन आदेश शेतकऱ्यांच्या जिव्हारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी काल प्रशासकीय बैठक घेऊन रिंग रोड साठी भूसंपादन करण्याचा आदेश दिला आहे. रिंग रोड साठी होणाऱ्या भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा तीव्र लढा सुरू असताना आपल्याला मते घालणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने राहण्याऐवजी रिंग रोड साठी थेट भूसंपादनाचा आदेश अधिकाऱ्यांना देणाऱ्या खासदारांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

खासदारांचा हा आदेश त्यांच्या जिव्हारी लागल्याच्या प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या आहेत. शेतकऱ्याची माता म्हणजेच काळी आई. तिच्यावर जगून सारा देश जगवण्याचे काम शेतकरी करत असतो. अशावेळी एखाद्या प्रकल्पाच्या नावाखाली जेव्हा त्याच्या हक्काची जमीनच हिसकावून घेतली जाते, तेव्हा त्याला रस्त्यावर यावे लागते. त्यामुळेच बेळगावच्या रिंग रोड मध्ये जाणाऱ्या हजारो एकर जमिनीच्या पुत्राने आक्रोश सुरू केला आहे. रिंग रोडला सातत्याने विरोध होत आहे. एक खासदार म्हणून या विरोधातून समन्वयाची भाषा बोलण्याची गरज होती. विरोधकांचे म्हणणे ऐकून घेऊन रिंग रोड संदर्भात योग्य दिशा ठरवण्याची गरज असताना खासदार जगदीश शेट्टर यांनी थेट भूसंपादनाचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्यामुळे खासदार सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नाहीत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Marve raju
Farmer leader raju marve

इतके दिवस बेळगावमध्ये पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना जगदीश शेट्टर दिल्लीत होते. या संदर्भात त्यांच्यावर जोरदार टीका होत होती. अशावेळी जगदीश शेट्टर आले. एक-दोन उद्घाटने केली आणि थेट शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा आदेश त्यांनी दिल्यामुळे आता संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून शेतकरी वर्गात नाराजी आहे.

त्या संदर्भातील पुढील आंदोलनाची आणि खासदारांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याची तयारी आता शेतकऱ्यांनी नेत्यांनी सुरू केली आहे.

इतर गोष्टींपेक्षा खा.शेट्टर यांनी बळ्ळारी नाल्याची समस्या सोडवावी -मरवे

स्थानिक गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करून संसदेतील अधिवेशनात इतर मुद्द्यावर बोलण्यापेक्षा खासदार जगदीश शेट्टर यांनी सर्वप्रथम गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांना भेडसावणारी बळ्ळारी नाल्याच्या पुराची समस्या मार्गी लावावी. तसेच शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे हलगा -मच्छे बायपास रस्ता आणि बेळगाव रिंग रोड हे प्रकल्प रद्द होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे परखड मत शेतकरी नेते राजू मरवे यांनी आज शनिवारी व्यक्त केले.

बेळगाव लाईव्हशी बोलताना राजू मरवे म्हणाले की, अलीकडेच निवडून आलेले बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर हे या भागातील बळ्ळारी नाल्याचा प्रश्न किंवा अतिवृष्टीमुळे मार्कंडेय नदीची पूर परिस्थिती या स्थानिक गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करून अधिवेशनासाठी गेले. वास्तविक पाहता जनता आणि शेतकरी संकटात असताना शेट्टर यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी कोणत्याही अधिवेशनाला जायचे नसते. कारण ते जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात. लोकांनी मतदान करून त्यांना खासदार पदावर बसवलेला असल्यामुळे जनतेच्या समस्या सोडवणे, त्यांचे प्रश्न मार्गी लावणे याला प्राधान्य देणे हे त्यांचे कर्तव्य असते. हे करण्याऐवजी त्यांनी अधिवेशनात जाऊन अन्य गोष्टींबाबत आपले विचार व्यक्त केले तर त्याला कांहीच अर्थ नाही. खरे तर अनेक वर्षापासून भिजत पडलेला बळ्ळारी नाल्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावावयास हवा. त्यासाठी त्यांनी अधिवेशनात आवाज उठवला पाहिजे होता. केंद्रातील एनडीआरएफचे पथक या ठिकाणी येऊन बळ्ळारी नाल्यामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीची पाहणी करून जाते. मात्र त्यांनीही आजतागायत याबाबतीत काहीही केलेले नाही, असे मरवे म्हणाले.

कालच घेतलेल्या एका बैठकीत खासदार जगदीश शेट्टर यांनी केलेल्या वक्तव्यावरून बेळगाव शहरासाठी होणाऱ्या रिंग रोडच्या बाबतीत आणि हलगा -मच्छे बायपासच्या निर्मितीसाठी त्यांचाही पुढाकार असल्याचे स्पष्ट होते. प्रत्यक्षात हे दोन्ही प्रकल्प चांगली सुपीक शेतजमीन उध्वस्त करणारे, शेतकऱ्यांना रसातळाला नेणारे आहेत.

त्यामुळे हे प्रकल्प तात्काळ रद्द केले केले पाहिजेत. हे दोन्ही प्रकल्प प्रत्यक्षात उतरले तर त्यामुळे या भागातील सर्व शेतकरी नष्ट होणार आहेत. तेंव्हा शेतकरी टिकला तर देश टिकणार आहे, याचा खासदार जगदीश शेट्टर यांच्यासह सरकारने गांभीर्याने विचार करावा. शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यासाठी म्हणून या भागातील शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याची प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करून त्वरित नुकसान भरपाई दिली जावी.

शेतकऱ्यांची विचारपूस केली जावी. कारण शेतकऱ्यांनीच आपल्याला मोठ केलं आहे हे लोकप्रतिनिधी व सरकारने ध्यानात ठेवावे. जर बायपास रस्ता आणि रिंग रोड करून शेतकऱ्यांना उध्वस्त केले जाणार असेल त्याचा मी जाहीर निषेध करतो, असे शेतकरी नेते राजू मरवे यांनी शेवटी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.