बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत् संघाच्यावतीने (इस्कॉन) जन्माष्टमीच्या निमित्ताने उद्या सोमवार दि. 19 पासून मंगळवार दि. 27 ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलांनंद मंदिरात उद्या सोमवारी श्री बलराम जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच त्यानंतर 26 ऑगस्टपर्यंत रोज सायंकाळी 6:30 वाजता परमपूज्य भक्ती रसामृतस्वामी महाराज यांचे कृष्ण कथा कथन होईल. या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीनिमित्त पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, अभिषेक, नाट्यलीला आणि कृष्ण कथाकथन आदी कार्यक्रम होणार असून रात्री सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे.
जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे येत्या 27 ऑगस्ट रोजी इस्कॉनचे संस्थापक आचार्य प.पू.श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस असल्याने तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यानिमित्त मंदिरात सकाळपासून दुपारपर्यंत विविध कार्यक्रम होणार असून प्रभुपाद यांच्या जीवनावर अनेक भक्तांची भाषणे होतील.
तसेच भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन होईल. त्यानंतर दुपारी सर्वांसाठी महाप्रसाद होईल. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि कृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉन बेळगावतर्फे करण्यात आले आहे.