बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वतः जातीने पहिली मोठी कारवाई करताना पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज पहाटे हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहावर धाड टाकून तीन चाकू, तंबाखूची पुडी, सिगारेट्स, वायरचे बंडल वगैरे अवैध साहित्य जप्त केले. अचानक पडलेल्या या धाडीमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली होती.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी पहाटे 5 वाजता हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहावर अचानक धाड टाकून कारवाई करण्यात आली.
सदर धाडीमध्ये 40 पोलीस अधिकारी आणि 220 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सदर धाडीप्रसंगी कारागृहाच्या संपूर्ण कानाकोपऱ्याची झाडाझडती घेण्यात आली. याप्रसंगी स्पोटक शोधणाऱ्या श्वानपथकांसह अवैध शस्त्रांचा छडा लावणाऱ्या मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला.
पोलीस आयुक्त मार्बन्यांग यांच्या नेतृत्वाखाली पहाटे 5 वाजल्यापासून प्रारंभ झालेली धाडीची कारवाई सकाळी बराच काळ सुरू होती. धाडीत तीन चाकू, तंबाखूची 10 पुडी, एक सिगरेट, लहान हीटर, वायरचे बंडल, विटांचा तात्पुरता स्टोव्ह वगैरे अवैध साहित्य जप्त करण्यात आले. बीआरपीएसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता टाकण्यात आलेल्या या धाडीमुळे हिंडलगा कारागृहातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची तारांबळ उडण्याबरोबरच कारागृहात एकच खळबळ उडाली होती.