बेळगाव लाईव्ह :अनगोळ रोड येथील श्रीहरी मंदिर जवळ रस्त्याशेजारी भूमिगत वीज वाहिन्यांना जोडलेल्या स्मार्ट सिटीच्या जमिनीवरील धोकादायक खुल्या डिस्ट्रीब्यूशन पॅनलला (डीपी) तात्काळ झाकण /दरवाजा बसवण्यात यावा, अशी जोरदार मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत घालण्यात आलेल्या भूमिगत वीज वाहिन्यांसाठी अनगोळ रोड येथील श्रीहरी मंदिर जवळ रस्त्याशेजारी जमिनीवर डिस्ट्रीब्यूशन पॅनल (डीपी) बसवण्यात आला आहे.
तथापि सदर डीपीचे झाकण गेल्या बऱ्याच महिन्यांपासून गायब झाले आहे. त्यामुळे आतील स्विच बोर्ड, फ्युजा आणि विजेच्या जिवंत वायरी धोकादायकरीत्या उघड्यावर पडल्या आहेत.
अलीकडे अर्थांजनासाठी एक गरीब वृद्ध महिला सदर डीपी समोरच रस्त्याशेजारी स्टॉल मांडून फुलं आणि फुलांच्या माळांची विक्री करण्यास बसलेली असते. सध्याचे पावसाचे दिवस लक्षात घेता खेळता वीज प्रवाह असलेला सदर खुला डीपी या वृद्ध महिलेच्या जीवितसाठी आणि इतरांसाठी देखील धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उघड्या पडलेल्या उपरोक्त डीपीला तात्काळ झाकण अथवा दरवाजा बसवावा अशी जोरदार मागणी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.