बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने गृहिणींना मदत म्हणून गृहलक्ष्मी योजना सुरू केली असली तरी सुतट्टी (ता. रायबाग जि. बेळगाव) गावातील एका वृद्धेने स्वतःला मिळालेले गृहलक्ष्मी योजनेचे पैसे गावासाठी खर्च केल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.
रायबाग तालुक्यातील सुतट्टी गावातील अक्काताई लंगोटी या वृद्धेने गृहलक्ष्मी योजनेतून मिळालेल्या पैशातून संपूर्ण गावाला जेवण दिले आहे. इतके करून न थांबता या आजींनी पाच जणांना भेटवस्तू सुद्धा दिल्या आहेत.
राज्यातील गृहिणी महिलांसाठी दर महिना 2 हजार रुपये देण्याची गृहलक्ष्मी योजना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुरू केली आहे.
या पद्धतीने महिलांचे भले चिंतनाऱ्या सिद्धरामय्या यांनी राजकीयदृष्ट्या आणखी वरचढ व्हावे याकरिता ग्रामदैवताची पूजा करून आपण अन्नदान केल्याचे आक्काताई लंगोटी यांनी सांगितले.