बेळगाव लाईव्ह विशेष : ७ सप्टेंबर रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्री गणेशोत्सवासाठी आतापासूनच तयारी सुरु झाली असून गणेशोत्सवात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या ‘देवाला देवपण देणाऱ्या हातांची’ लगबग देखील युद्धपातळीवर सुरु झाली आहे….! जसजशी गणेश चतुर्थी जवळ येते तशी मूर्तिकारकांची लगबग वाढत असते. याच अनुषंगाने नार्वेकर गल्ली येथील मूर्तिकार विष्णू गोदे यांच्या गणेश मूर्ती कारखान्यास्थळी भेट देत, ‘बेळगाव लाईव्ह’ ने त्यांच्याशी संवाद साधला.
मूर्तिकार विष्णू गोदे हे गेल्या ३० वर्षांपासून मूर्तिकामात व्यस्त आहेत. आजवर त्यांनी अनेक घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या, नवरात्रीतीतील श्री दुर्गामातेच्या रूपातील अनेक मूर्ती घडविल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या मूर्तींना बेळगावच नाही तर परगावातही मोठी मागणी असते. नाविन्यपूर्ण रंगकाम आणि मागणीनुसार इत्यंभूत शैलीतील मूर्ती साकारणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
घरगुती मूर्तींसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीदेखील त्यांनी साकारल्या असून आकर्षक मूर्ती त्यांनी घडविल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे विविध स्वरूपातील मूर्ती उपलब्ध असून यंदाच्या गणेशोत्सवात अयोध्या राम मंदिराच्या धर्तीवर गणेशोत्सवाची थीम सजत असल्याचे ते सांगतात. अयोध्या येथील श्री राम मंदिराची ‘क्रेझ’ गणेश भक्तांमध्ये असल्याने श्रीरामाच्या अवतारातील गणेश मूर्तीना मोठी मागणी असल्याचे विष्णू गोदे यांनी सांगितले.
विष्णू गोदे यांनी यंदा विविध नाविन्यपूर्ण रंग, मागणीनुसार मूर्तीचे स्वरूप साकारल्याने परगावाहून येणाऱ्या गणेश मूर्ती मागणीधारकांची संख्याही वाढली आहे. शिवाय स्थानिक नागरिकांनीही पाठिंबा देत गणेश मूर्ती नक्की केल्या असून प्रशासनाच्या नियमावलीनुसार ९.५ फूट उंचीच्या मूर्ती घडविण्यात आल्या आहेत.
केवळ व्यवसाय म्हणून नाही तर आवड आणि कला जोपासत त्यांनी आजवर शेकडो मूर्ती घडविल्या. यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेश मूर्तींचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून आता अंतिम टप्प्याकडे कामकाज सुरु आहे. घरगुती मूर्तींचे रंगकाम आणि सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले मूर्तीवरील खडे, लेस, आभूषणांच्या सजावटीचे – कलाकुसरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
येत्या १५ दिवसात हे कामकाज पूर्ण करायचे असून यासाठी रात्रंदिवस मूर्तिकारांसह त्यांचे सहकारी देखील काम करत असून त्यांनी घडविलेल्या मूर्ती अत्यंत सुबक, उत्तम प्रतीच्या आहेत. येथील मूर्ती आणि रंगकाम पाहिल्यास कलाकाराच्या हातात जादू असते, याची खात्री पटते. कलाकारच त्यांच्या विशाल कल्पक दृष्टीने अशी कलाकृती घडवू शकतात हेच विष्णू गोदे यांनी घडविलेल्या मूर्तींकडे पाहून जाणवते.