बेळगाव लाईव्ह :श्रीमाता, श्री भक्ती महिला, समर्थ अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी आणि श्री राजमाता महिला मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या मंगळवार दि. 20 ते शुक्रवार दि. 23 ऑगस्ट 2024 पर्यंत असे सलग चार दिवस श्री गणेश फेस्टिवल बेळगाव -2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
न्यू गुडसशेड, बेळगाव येथील श्री माता सोसायटीच्या सभागृहामध्ये हा श्री गणेश फेस्टिवल होणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2:45 वाजता फेस्टिवलचे उद्घाटन होणार असून त्यानंतर दुपारी 3 वाजता महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
दुसऱ्या दिवशी बुधवारी 21 रोजी दुपारी 3 वाजता पाककला स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेचा विषय मुगाचे गोड पदार्थ व मुगाचे तिखट पदार्थ बनवणे, हा असेल. स्पर्धकांनी पदार्थ घरी बनवून कृती व साहित्य लिहून आणावयाचे आहे. या दोन्ही स्पर्धा वेगवेगळ्या असणार आहेत. स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रुपये 2000, 1500 व 1000 असे बक्षीस दिले जाईल. याखेरीज तीन उत्तेजनार्थ बक्षीसे असतील. होम मिनिस्टर आणि पाककला स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी नांव नोंदणीसह अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा.
तिसऱ्या दिवशी गुरुवारी 22 रोजी सायंकाळी 4 वाजता शाहीर अभिजीत कालेकर लिखित आणि लोक संस्कृती नाट्यकला संस्था, खानापूर प्रस्तुत ‘जागर लोक संस्कृतीचा’ हा कार्यक्रम होणार आहे. शेवटच्या दिवशी शुक्रवारी 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवरत्नांचा सत्कार केला जाईल. सत्कारमूर्तींमध्ये गौरी संकेत मांजरेकर (समाज सेविका), परशराम निंगाप्पा मोटराचे (साहित्य), गोविंद लक्ष्मण गावडे (नाट्य), संतोष शंकर गुरव (संगीत), श्रीधर देवाप्पा धामणेकर (उद्योग), मयुरा मिहीर शिवळकर (क्रीडा), संध्या शिवाजी पाटील (श्रम सेवा), चिदंबर चन्नाप्पा पट्टणशेट्टी (कृषी) आणि गायत्री एमिटीज फाउंडेशन (सामाजिक संस्था) यांचा समावेश आहे.
तरी शहरवासीयांनी या फेस्टिवलचा बहुसंख्येने उपस्थित राहून आनंद लुटावा, असे आवाहन श्री गणेश फेस्टिवल आयोजक समितीचे अध्यक्ष मनोहर देसाई व सरचिटणीस विलास अध्यापक यांनी केले आहे.