बेळगाव लाईव्ह : श्रीमाता सहकारी पतसंस्था, श्री राजमाता महिला सहकारी संस्था, श्री भक्ती महिला सहकारी पतसंस्था, श्री समर्थ अर्बन सहकारी पतसंस्था आणि ज्ञानमंदिर इंग्लिश मिडीयम शाळा यांच्या संयुक्ताश्रयाने आयोजिण्यात आलेल्या २०२४ सालच्या श्री गणेश फेस्टिव्हल सोहळ्याची सांगता नवरत्नांच्या सत्काराने झाली.
श्रीमाता सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या सांगता समारंभात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवरत्नांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजसेविका – गौरी मांजरेकर, साहित्यरत्न – परशराम मोटारचे, नाट्यभूषण – गोविंद गावडे, संगीतरत्न – संतोष गुरव, उद्योगरत्न – श्रीधर धामणेकर, क्रीडारत्न – मयुरा शिवळकर, श्रमसेवा संध्या पाटील, कृषिरत्न चिदंबर पट्टणशेट्टी आणि सामाजिक संस्था म्हणून गायत्री एमिटीज फाउंडेशन याना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संयोजक सहकारी संस्थांच्या संचालिकांच्या हस्ते गणेशपूजन आणि आरतीने झाली. त्यानंतर श्री गणेश फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनोहर देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, समाजातील भेदभावाची दरी मिटावी, उत्सवादरम्यान होणारी भंपकबाजी टाळून उत्सवाचा मूळ उद्देश साधला जावा, सर्वसामान्य, तळागाळातील जनतेच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने सहकार्याची भूमिका ठेवावी, सण, समारंभ, उत्सव, कार्यक्रमात होणारी विनाकारण उधळपट्टी थांबावी या उद्देशाने श्री गणेश फेस्टिव्हलची गेल्या २५ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. आजही याच उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.
समाजातील पडद्यामागे कार्यरत राहणाऱ्या, उपेक्षित मान्यवरांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कार्याची दखल घ्यावी यासाठी गेली २५ वर्षे समाजातील तळागाळातील मान्यवरांचा सत्कार म्हणून नवरत्नांचा सत्कार आयोजिला जातो. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन प्रत्येकाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सहयोगी संस्थांच्या संचालक – संचालिका, गणेश फेस्टिव्हलचे पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवरत्नांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त करत आपल्याला कलेची, कार्याची दखल घेतल्याबद्दल श्री गणेश फेस्टिव्हलचे आभार मानले. यावेळी श्री गणेश फेस्टिव्हलचे सरचिटणीस विलास अध्यापक, खजिनदार सुनील पाटील, सदस्य चंद्रकांत पाटील, श्रीकांत काकतीकर, महेश वस्त्रद, मारुती दळवी, अभिजित चव्हाण, श्रीनाथ पाटील, हेमंत देसाई, संजीव नेगिनहालं, अतुल कुलकर्णी, दयानंद बडस्कर, राजेश सावंत, विशाल देशपांडे, सुरज हुलबत्ते, मनोरम देसाई, ज्योती अग्रवाल, डॉ. मीना पाटील, रुपाली जनाज, प्रतिभा नेगिनहालं, भक्ती देसाई, अलका जाधव, सुवर्ण बिर्जे, फरीदा मिर्झा आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुधा सांबरेकर यांनी केले तर आभार श्रीकांत काकतीकर यांनी मानले.