बेळगाव लाईव्ह :स्वीडनमधील गोटेनबर्ग येथे येत्या 13 ते 25 ऑगस्ट 2024 या कालावधीत होणाऱ्या जागतिक मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे बेळगावचे ज्येष्ठ धावपटू एस. एल. देवरमनी यांचा केएलएस पब्लिक स्कूलतर्फे आज गुरुवारी सकाळी सत्कार करण्यात आला.
केएलएस पब्लिक स्कूलतर्फे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ धावपटू एस. एल. देवरमनी यांचा शाल श्रीफळ भेटवस्तू आणि राष्ट्रध्वज तिरंगा भेट देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे धावण्यासाठी आवश्यक असलेले रिबॉकचे ब्रँडेड स्पोर्ट्स शूज अर्थात धावण्याची बूट त्यांना भेट देण्यात आले.
यावेळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी एस. एल. देवरमनी यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या विजयासाठी प्रार्थना केली. यावेळी बोलताना ॲथलीट एस.एल. देवरमणी यांनी आपल्या बालपणीच्या शालेय दिवसांबद्दल माहिती देण्याबरोबरच शेतकरी कुटुंबाच्या पार्श्वभूमीतून त्यांनी क्रीडा क्षेत्रात कशी यशस्वी कारकीर्द घडवली याबद्दल सांगितले.
जीवनातील ध्येये साध्य करण्यावर लक्ष केंद्रित कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करताना त्यांनी मुलांनी मोबाईल आणि व्यसनांपासून दूर राहून खेळाबरोबरच अभ्यासावरही अधिक लक्ष केंद्रित करावे. पालकांचा आणि शिक्षकांचा आदर करावा असे सांगितले. तसेच निरोगी आरोग्याची उपयुक्तता स्पष्ट केली. वयाच्या 72 व्या वर्षी मी माझ्या देशाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहे तुम्ही तर माझ्यापेक्षा आधी हे यश मिळवू शकता असेही एस. एल. देवरमनी म्हणाले.
कार्यक्रमास केएलएस शाळेच्या प्राचार्या शालिनी संक्रोनी, मोफिदा येल्लूर, प्रमोद ओऊळकर, गीता कलभावी, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, नितीन लोकूर, ओम अनावेकर, सोहम अनावेकर, शैलेश भातकांडे, सुनील धोंगडी, उदय किंजवडेकर, चंद्रकांत चव्हाण आदीसह विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. स्वीडनमधील गोटेनबर्ग येथे 13 ते 25 ऑगस्ट 2024 या कालावधीत होणाऱ्या प्रतिष्ठित जागतिक मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी 72 वर्षीय एस.एल. देवरमनी यांची या ज्येष्ठ धावपटू आणि सेवानिवृत्त भारतीय संरक्षण सेवेतील कर्मचारी यांची निवड करण्यात आली आहे.
सदर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील 10 कि.मी. धावणे, 5 कि.मी. धावणे आणि चालण्याची शर्यत या क्रीडा प्रकारात देवरमनी भाग घेणार आहेत. स्वीडन मधील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना प्रवास आणि निवास वगैरे एकूण अंदाजे रु. 3 लाख रुपये खर्च येणार आहे. सेवानिवृत्त एस एल देवरमणी आपले निवृत्तीवेतन आणि चन्नम्मा नगरमधील आपल्या छोट्या किराणा दुकानावर चरितार्थ चालवतात त्यामुळे त्यांच्यासाठी स्वीडनला जाण्यासाठी आवश्यक असलेली 3 लाख रुपयांची रक्कम फार मोठी असल्यामुळे जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एस. एल. देवरमनी यांना आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे.
मास्टर्स ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने देवरमनी यांना आधीच आमंत्रण दिले आहे. त्याचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी तातडीच्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यासाठी एस. एल. देवरमणी यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले असून इच्छुकांनी पुढील खात्यावर आपल्या परिमेय मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बँक तपशील – खातेधारक : एस.एल. देवरमणी. खाते क्रमांक : 30264101233, बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया, राणी चन्नम्मा नगर शाखा, बेळगाव. फोन पे : सूर्योदय जनरल स्टोअर्स. मोबाईल क्रमांक – 9481323942.