बेळगाव लाईव्ह : समाजातील सर्व घटकांचे कल्याण करण्यासाठी सहकारी बँकांनी शास्त्रोक्त पद्धतीने काम करण्याची गरज असून खिरापतीप्रमाणे लोकांना पैसा न वाटता योग्य अभ्यास करून, शास्त्रोक्त पद्धतीने काम करून कर्जवितरण करणे, कर्जवितरणाच्या मागचा हेतू सिद्ध करणे आणि ग्राहकांशी अतूट नाते कायम ठेवणे गरजेचे आहे असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. बेळगावमधील दैवज्ञ सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सहकार क्षेत्रात संस्थांनी कशापद्धतीने काम करण्याची गरज आहे, याबद्दल विचार मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी दैवज्ञ सहकारी बँकेच्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी, संचालक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांसह दैवज्ञ समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यावेळी बोलताना म्हणाले, आपले आणि बेळगावचे नाते जुने आहे. मी देखील चेअरमनपदी कार्यरत होतो. मात्र कालांतराने राजकारणात गेल्याने संपर्क कमी झाला.
दैवज्ञ सहकारी बँक हि एका समाजातील लोकांनी सुरु केलेली संस्था असून एका संस्थेची ५० वर्षे वाटचाल होणे हि मोठी वाटचाल आहे. अनेक संस्था जन्माला येतात पण त्यांची घोडदौड कायम राहतेच असे नाही. परंतु ग्राहकांशी असलेले नाते, पारदर्शक व्यवहार यामुळे दैवज्ञ सहकारी बँक आज ५० वर्षांचा टप्पा गाठली असून हि खूप मोठी कामगिरी असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष उदयशंकर भट, उपाध्यक्ष मंजुनाथ शेट, सुवर्ण महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष राजेश अणवेकर, संस्थेचे संचालक सदानंद रेवणकर, जीवन वेर्णेकर, कल्पना अणवेकर, समीर अणवेकर, जीवन वेर्णेकर, माणिक अणवेकर, गणेश वेर्णेकर, विनिता शेट, राजेश अणवेकर, रघुनाथ सेजेकर, दयानंद नेतलकर, जनरल मॅनेजर पदमनाभ शेट आदींसह संस्थेचे भागधारक, ठेविदारक, सर्व सभासद, ग्राहक आणि हितचिंतक उपस्थित होते.