बेळगाव लाईव्ह :महिला, मुलींचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या लोकांची एक टोळी बेळगाव आली असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो निखालस खोटा आहे, असे स्पष्ट करून अफवा पसरवणाऱ्यांना खपवून घेतले जाणार नाही.
जे लोक चुकीची माहिती पसरवत आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा बेळगाव शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. “कांही लोकांची एक टोळी बेळगावात आली आहे.
बेळगावमध्ये तुमचे अपहरण करून बलात्कार करत आहेत. बेळगाव शहरातील टिळकवाडी गोवावेस, डी. पी. स्कूल आणि टिळकवाडी परिसर हे त्यांचे मुख्य लक्ष्य आहे. ते तुमचा पाठलाग करतात, तुम्ही कुठे राहता ते बघतात आणि तुमचे अपहरण करतात.
जर कांही चुकीचे घडत आहे असे वाटल्यास तुमचे पालक आणि पोलिसांना कळवा. एकट्याने जाणे टाळा आणि सुरक्षित रहा. तुमच्या बहिणी आणि मित्रांना ही माहिती देऊन सावध करा”. अशा आशयाचा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मार्बन्यांग यांनी वरीलप्रमाणे खुलासा करून इशारा दिला आहे.