बेळगाव लाईव्ह :मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव ते मिरज दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरती सुरू करण्यात आलेली विशेष पॅसेंजर रेल्वे सेवा येत्या 17 ऑगस्टला बंद न करता कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव आणि मिरज दरम्यान दिवसातून दोन वेळा विशेष पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि प्रवाशांची सोय होत आहे. तथापि सदर विशेष पॅसेंजर रेल्वे सेवा येत्या 17 ऑगस्टपर्यंतच सुरू राहणार आहे.
बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक रस्ते बंद झाले होते. याचा विचार करून गेल्या 30 जुलैपासून ही विशेष रेल्वे सुरू करण्यात आले होती. पहिल्या टप्प्यात 6 ऑगस्ट त्यानंतर 10 ऑगस्ट आणि आता पुन्हा 17 ऑगस्टपर्यंत ही रेल्वे सेवा वाढविण्यात आली आहे.
सध्या बेळगावहून मिरजेला तसेच मिरजेहून बेळगावला येणाऱ्या प्रवाशांसाठी ही रेल्वे सेवा अतिशय सोयीस्कर झाली आहे. आता 17 ऑगस्ट नंतर ही सेवा बंद झाल्यास त्याचा असंख्य लोकांना फटका बसणार आहे. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करून रेल्वे प्रशासनाने बेळगाव ते मिरज दरम्यानची विशेष पॅसेंजर रेल्वेची सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
रेल्वे क्र. 07301 बेळगाव -मिरज विशेष पॅसेंजर रेल्वे बेळगाव येथून सकाळी 6 वाजता निघून सकाळी 9 वाजता मिरजेला पोहोचते. तसेच रेल्वे क्र. 07302 रेल्वे मिरजेहून सकाळी 9:50 वाजता प्रस्थान करून दुपारी 12:50 वाजता बेळगावला पोहोचते.
त्याचप्रमाणे रेल्वे क्र. 07303 ही विशेष पॅसेंजर रेल्वे बेळगावहून दुपारी 1:30 वाजता निघून मिरजेला सायंकाळी 4:30 वाजता पोहोचते. मिरजेहून रेल्वे क्र. 07304 ही रेल्वे सायंकाळी 5:35 वाजता निघून रात्री 8:35 वाजता बेळगावला पोहोचते.