बेळगाव लाईव्ह : हत्येच्या आरोपाखाली परप्पन अग्रहार कारागृहात असलेल्या अभिनेता दर्शनला विशेष वागणूक दिल्याच्या आरोपाप्रकरणी सात जणांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणी आणखी कोणीही दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी दिली.
सोमवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, दर्शन प्रकरणात अधिकाऱ्यांची कुचराई झाली असून 7 जणांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. आणखी काही जणांवर कारवाई केली जाईल. ही अधिकाऱ्यांच्या पातळीवरील हलगर्जी असून, या प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाई केली जाईल.
गृहमंत्र्यांना घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या अहवालाच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय दर्शनला दुसऱ्या कारागृहात हलवायचे की नाही याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्ही पाच हमीभाव लागू करून लोकहितवादी असल्याचे सिद्ध केले आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे आम्हाला प्रश्न विचारण्याची नैतिकता नाही, अशा शब्दात त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले.
यावेळी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, बेळगाव जिल्हा हा मोठा जिल्हा असून त्याचे विभाजन करण्याबाबत आमदारांशी चर्चा होईल.. चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.