बेळगाव लाईव्ह : मुडा भ्रष्टाचार प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या चांगलेच अडकले असून त्यांच्याविरोधात भाजपने आघाडी उघडली आहे. आता राज्यपालांनीही मुडा प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास मान्यता दिली आहे.
दरम्यान राज्यपालांच्या या भूमिकेवर माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून मुडा घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले, सिद्धरामय्या हे मोठे नेते आहेत. येडियुरप्पा मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर सिध्दरामय्यांनी बोललेल्या सर्व गोष्टी त्यांनीच आता आठवणे गरजेचे आहे.
विरोधीपक्ष नेते म्हणून सिध्दरामय्यांनी अनेक गोष्टी बोलून दाखविल्या. यानुसार आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी रमेश जारकीहोळी यांनी केली. ते पुढे म्हणाले, सिद्धरामय्या हे उत्तम राजकारणी आहेत, त्यांचे राजकीय चारित्र्य डागरहित आहे. कायदेशीर लढ्यानंतर जर त्यांना क्लीन चिट मिळाली तर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे.
यावेळी रमेश जारकीहोळी यांनी डी. के. शिवकुमार यांना लक्ष्य करत ‘सीडी शिवू’ प्रकरण उजेडात आले तर काँग्रेसचे सरकार दोन दिवसात कोसळेल असा दावा केला.
त्यांचे व्यक्तिमत्व आणि भ्रष्टाचार हा डोईजड झाला असल्याची टीकाही त्यांनी केली. ते पुढे म्हणाले काही विषयांवर चर्चा करण्यासाठी कोअर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पक्षश्रेष्टींच्या निर्णयाशी आम्ही कटिबद्ध असल्याचेही रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.