बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेकडून शहरातील नरगुंदकर भावे चौक, कांदा मार्केट आणि कोतवाल गल्ली या तीन ठिकाणी वेंडिंग झोन स्थापन करण्यात येणार असून या प्रकल्पासाठी 1.10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी काल बुधवारी महापालिकेत आयोजीत शहर व्यापार समितीच्या बैठकीत दिली.
शहरात तयार करण्यात येणाऱ्या वेंडिंग झोनमध्ये बाजार कट्टे त्यावर शेड, पिण्याचे पाणी दिवाबत्ती आणि स्वच्छतागृहे यासारख्या सुविधांचा समावेश असेल.
मात्र या वेंडिंग झोनची अंमलबजावणी पोलिस विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) अद्याप न मिळाल्याने प्रलंबित आहे. एनओसी देण्याची प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, असे आश्वासन बैठकीला उपस्थित असलेल्या पोलीस विभागाच्या प्रतिनिधींनी दिले आहे.
बैठकीस उपस्थित व्यापार समितीच्या प्रतिनिधींनी भू-भाडे वसुली रद्द करण्याची मागणी केली. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये बैठ्या विक्रेत्यांकडून भू-भाडे वसूल केले जात नाही. त्याच धर्तीवर बेळगाव ते ही भू-भाडे वसुल केले जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपायुक्त तळवार यांनी दिली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने वेंडिंग झोनचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी तो शासनाकडे पाठविला जाईल.
शहापूर येथील दाणे गल्ली येथील वेंडिंग झोनचा प्रस्ताव तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. बैठकीत उपस्थित व्यापार समितीचे प्रतिनिधी व शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.