बेळगाव लाईव्ह:गणेशोत्सव काही दिवसांवर येवून ठेपला असल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पूर्वतयारीला सुरवात करण्यात आली आहे. शुक्रवारी महापौर, उपमहापौर, नगरसेवक आणि आयुक्तांच्या उपस्थितीत कपिलतीर्थ येथे पूजन करून स्वच्छतेच्या कामाला चालना देण्यात आली.
गणेशोत्सव जवळ आला असल्यामुळे सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने पालकमंत्री सतीश जारकिहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना भेटून विविध सूचना केल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आज महापालिका प्रशासनाने कामाला सुरवात केली.
सकाळी कपिलतीर्थ येथे महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते तलावाचे पूजन करण्यात आले. यावेळी आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दोन्ही विसर्जन तलावांची स्वच्छता करण्यात यावी. याशिवाय इतर तलावही सुसज्ज करावेत, अशा सूचना केल्या.
यावेळी सत्ताधारी गटनेते गिरीश धोंगडी, स्थायी समिती अध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती, श्रीशैल कांबळे, रेश्मा कामकर, नेत्रावती भागवत, नगरसेवक नितीन पाटील, अभिजीत जवळकर, संतोष पेडणेकर, सिद्धार्थ भातकांडे आदी उपस्थित होते.
या पूजनानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तलाव स्वच्छतेच्या कामाला सुरवात करण्यात आली. गणेशोत्सव काळात कोणताही अडथळा येवू नये, यासाठी आता सोमवारी मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे.