बेळगाव लाईव्ह :शहरातील सरदार मैदाना शेजारील कॉलेज रोडच्या दुभाजकावर असलेल्या विलायती चिंचेच्या झाडाच्या फांद्या मोठ्या वाहनांतील विशेष करून बसमधील प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत असून त्यात त्वरित छाटण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सरदार मैदानाजवळील कॉलेज रोडच्या दुभाजकावर बेळगाव सोशल क्लब समोर रस्त्याच्या मधोमध विलायती चिंचेचे झाड आहे. सदर रस्ता हा शहरातील प्रमुख रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर सततची रहदारी असते.
संबंधित झाड हे नेमके रस्त्याच्या वळणाच्या ठिकाणी असल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांसाठी या झाडाच्या फांद्या त्रासदायक ठरत आहेत. दररोज कर्नाटक परिवहन बसमधून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना याचा फटका बसत आहे.
विलायती चिंचेचा या झाडाला काटे असल्यामुळे ते बस आणि इतर मोठ्या वाहनातून प्रवास करणाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. झाडाच्या फांद्या, डहाळ्या आणि त्यावरील काट्यांमुळे एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर गंभीर जखमा होऊ शकतात. तसेच डोळ्यांना दुखापत झाल्यास कायमचे अंधत्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन शक्य तितक्या लवकर या विलायती चिंचेच्या वाढत असलेल्या फांद्या डहाळ्या छाटून टाकाव्यात. तसेच अशी जाड काटेरी झाडे रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकांवर लावली जाऊ नयेत, अशी मागणी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केली आहे.
त्यांनी ही मागणी महापालिका आयुक्तासह जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे देखील केली आहे.