बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन दिवसापासून बेळगाव दौऱ्यावर असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नाग लक्ष्मी चौधरी यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षेवर भर देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा आयुक्तांना पत्र लिहिण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हास्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांनी शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेची नियमित तपासणी करावी एसओपीचे पालन न करणाऱ्या संस्था आणि वसतिगृहे बंद करावी लागतील अश्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
नागलक्ष्मी यांनी तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यानंतर आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहे. सवदत्ती पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या 8-9 बेपत्ता गुन्ह्यांपैकी 8 गुन्ह्यांचा शोध लागला आहे. अंगणवाडी केंद्रांमध्येही चांगले शिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधा देणे बंधनकारक आहे. महिलांच्या वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष अॅपद्वारे देखरेख करावी, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण विभागाच्या संचालकांना दिल्या.
जिल्ह्यातील मेंढी लोकर कारखान्यात काम करणाऱ्या एकूण 1200 लोकांपैकी 70% महिला आहेत. त्यांची थकबाकी भरण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीच विविध विभागांना शासनाने मंजूर केलेले अनुदान आणि महिला सक्षमीकरणासाठी हाती घेतलेल्या कार्यक्रमांची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस ठाण्यांनी काम करावे. शाळा-महाविद्यालयांमध्ये 112 हेल्पलाइनबाबत जनजागृती करावी, पोलिसांनी ओपन हाऊस उपक्रमांतर्गत जनजागृती करावी. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या कमी होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
बेळगावातील ई-टॉयलेटची देखभाल पुरेशी करावी, असे पत्र राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्याना लिहून शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हास्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांनी शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेची नियमित तपासणी करावी. एसओपी नियमांचे पालन न करणाऱ्या संस्था आणि वसतिगृहे बंद करावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश कोणी आदींचा सहभाग होता.