बेळगाव लाईव्ह : विज्ञान शाखेचे शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या सहकार्याने ‘सीईटी-सक्षम’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमांतर्गत आज जिल्ह्यातील सर्व शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात पहिली सीईटी सराव परीक्षा पार पडली, अशी माहिती जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी दिली.
आज जिल्ह्यातील सर्व पदवीपूर्व महाविद्यालयातील पीयूसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा पार पडली. यावेळी बेळगावमधील सरदार्स महाविद्यालयात जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन परीक्षा प्रक्रियेचे निरीक्षण केले.
यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना ते म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात जिल्हा पंचायत बेळगाव आणि पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेला सीईटी सक्षम हा उपक्रम सुरु झाला असून बेळगाव जिल्ह्यातील सुमारे 34 विज्ञान महाविद्यालयांमध्ये सीईटी-सक्षम परीक्षा घेण्यात आली आहे.
यामध्ये 3500 विद्यार्थी सराव परीक्षेला सामोरे गेले असून ही परीक्षा ओएमआरवर आधारित आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना जागृत करणे आणि सीईटीची भीती दूर करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
परीक्षेच्या दोन दिवसांत म्हणजेच सोमवारी जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर जिल्ह्यातील सर्व विज्ञान शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये शंकानिरसन सत्र आयोजित करून परीक्षेचे विश्लेषण करण्यात येणार आहे. हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम असून वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हा उपक्रम राबवित असल्याचे राहुल शिंदे यांनी सांगितले.
त्यांनी इलेक्टोरल लिटरसी असोसिएशन (ELC) च्या कार्याचा आढावा घेतला, त्यासोबतच त्यांनी 17 वर्षावरील विद्यार्थ्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले .यावेळी मुख्याध्यापक वाय.एम.पाटील, व्याख्याते विजयकुमार हत्ती, ईएलसी नोडल अधिकारी एम.एम.मुल्ला, प्राचार्य शिवानंद हादिमानी आदी उपस्थित होते.