बेळगाव लाईव्ह:गेल्या चार दिवसांपासून दारू पिऊन वाहन चालविण्याविरोधात रहदारी पोलिसांकडून व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून एकूण 126 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मद्यपान अर्थात दारू पिऊन वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र तरीही बरेच जण दारू पिऊन वाहन चालवण्यात धन्यता मानतात. दारूच्या नशेत भरधाव वाहन हाकणाऱ्या अशा लोकांकडून अपघाताच्या घटना घडतात. याचा फटका त्या वाहनचालकाला तर बसतोच शिवाय रस्त्यावरून जाणाऱ्यांनाही निष्कारण अपघाताची झळ सोसावी लागते.
दारूच्या नशेत वाहनावरील नियंत्रण सुटून घडलेल्या अपघातात बऱ्याच जणांना प्राण देखील गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव रहदारी पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून दारू पिऊन वाहने चालवणाऱ्या विरुद्ध व्यापक मोहिम उघडली आहे.
यासाठी विशेष करून सायंकाळनंतर शहरातील ठराविक रस्ते आणि चौकात थांबलेल्या पोलिसांकडून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी केली जात आहे. या माध्यमातून गेल्या चार दिवसात एकूण 126 वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच मद्यपान करून वाहन चालवू नका. हे केवळ तुमच्या जीवनासाठीच नाही तर इतरांच्या जीवनासाठीही धोकादायक आहे, असे आवाहन पोलीस खात्याने केले आहे.