बेळगाव लाईव्ह : मुडा घोटाळाप्रकरणी अडचणीत आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांविरोधात काही वक्तव्ये केली. या वक्तव्यांचा मुद्दा उचलून धरत विरोधी पक्षाने आता थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन हाती घेण्यात आले होते. भाजप नेत्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
मुडा घोटाळाप्रकरणी राज्यपालांनी दिलेल्या आदेशानंतर काही काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांविरोधात अवमानकारक वक्तव्ये केली असा आरोप विधकांनी केला असून बांग्लादेशच्या धर्तीवर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर कारवाई करण्यात यावी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या करत बेळगावमधील राणी कितत्तुर चन्नम्मा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस विरोधात भाजप नेत्यांनी जोरदार निदर्शने केली.
काँग्रेसने आधीच बऱ्याच गोष्टींची उलथापालथ केली आहे. मात्र चोर आणि शिरजोर अशी भूमिका सध्या काँग्रेस अवलंबत असून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर खटला चालविण्याचा निर्णय योग्यच घेतला असल्याचे भाजप नेत्यांनी यावेळी सांगितले.
भाजप प्रदेशाध्यक्ष अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
काँग्रेसने राज्यातील नागरिकांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांना थोडी तरी लाज असेल तर त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, ज्या पद्धतीने काँग्रेस नेते विधाने करीत आहेत, हि विधाने भारतात करावीत असा आपला देश नव्हे. बांग्लादेशच्या धर्तीवर आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी हा देश बांगलादेश नसून भारत आहे, हे ध्यानात ठेवावे, असा सज्जड दम भाजप नेत्यांनी यावेळी दिला.
यावेळी सुभाष पाटील, महादेवाप्पा यादवाड, विश्वनाथ पाटील, मुरुघेन्द्रगौडा पाटील, लीना टोपण्णावर, उज्वला बडवाण्णाचे, गीता सुतार, तसेच भाजप शहर आणि ग्रामीण मंडळचे पदाधिकारी, भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.