बेळगाव लाईव्ह : श्री गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात सुरु असून मूर्तिकार श्री गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवताना दिसून येत आहेत. बेळगाव शहर आणि परिसरात वर्षानुवर्षे मूर्ती व्यवसायात गुंतलेले मूर्तिकार आपल्यासह संपूर्ण कुटुंब आणि कामगारांसह मूर्तिकामात व्यस्त असून गेल्या ५० वर्षांपासून या व्यवसायात व्यस्त असणारे बेळगावचे मूर्तिकार मनोहर पाटील हे आपल्या कुटुंबातील दुसऱ्या पिढीसमवेत मूर्ती व्यवसाय सांभाळत आहेत.
भांदूर गल्ली येथे मूर्ती व्यवसायाला सुरुवात केलेले मनोहर पाटील हे वयाच्या ७३ व्या वर्षीही उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाखाली एम. जी. पाटील, संजय किल्लेकर, नागेश हाजगोळकर यांच्यासारखे अनेक दिग्गज मूर्तिकार घडले आहेत. हे मूर्तिकार सध्या बेळगावमधील नामांकित मूर्तिकार म्हणून नावारूपाला आले आहेत.
आता या व्यवसायात विनायक पाटील आणि प्रसाद पाटील हे मनोहर पाटील यांचे दोन्ही चिरंजीव देखील उतरले असून मूर्ती कारखान्यात श्री गणेश मूर्तींसह, छत्रपती शिवाजी महाराज, नवरात्रोत्सवात लागणाऱ्या देवीच्या विविध रूपातील मूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत बसवेश्वर महाराज आणि असंख्य महापुरुषांच्या मूर्ती घडविल्या जातात.
मनोहर पाटील यांच्या या मूर्ती कारखान्यात बारा महिने मूर्ती घडविण्याचे कामकाज चालते. केवळ मूर्ती घडविणेच नाही तर मूर्तिकार देखील घडविण्याचे काम करणाऱ्या मनोहर पाटील यांनी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५० हुन अधिक सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्ती साकारल्या आहेत. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४ ते ६ महिन्यांपासून आधी काम सुरु करण्यात येते. आता गणेशोत्सव १०-१२ दिवसांवर येऊन ठेपला असून रात्रंदिवस कामगार अंतिम टप्प्यात कामकाज करत आहेत. मूर्ती वेळेत तयार करणे हे अत्यंत गरजेचे असून आपल्यासहीत आपले कुटुंब आणि जवळपास १५ ते १६ कामगार अंतिम टप्प्यात रंगकाम करत असल्याची माहिती ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना मनोहर पाटील यांनी दिली.
मनोहर पाटील यांच्या कारखान्यात सार्वजनिक श्रीमूर्तींवर अंतिम टप्प्यात रंगकाम करण्यात येत असून घरगुती मूर्तींचे कामकाज जवळपास पूर्ण झाले आहे. बेळगावसह दावणगेरे, हुबळी, धारवाड यासह विविध ठिकाणांहून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती बनविण्याची ऑर्डर दिली असून येत्या दोन दिवसात या मूर्ती विविध ठिकाणी रवाना केल्या जाणार आहेत.
सुरुवातीच्या काळात १ – २ फूट उंचीच्या आणि शाडूच्या मूर्ती बनविण्यास गणेश भक्त अधिक प्राधान्य देत होते. मात्र ज्यावेळी पीओपी पासून मूर्ती बनविणे सुरु झाले तेव्हापासून २ फुटांच्या मूर्ती आता ८ ते १० फूट उंचीपर्यंत बनवून घेतल्या जात आहेत. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ८ फुटांवरून १८ फुटांच्या मूर्ती बनविण्यास प्राधान्य दिले आहे, असे मनोहर पाटील म्हणाले. यंदा सर्वात उंच मूर्ती येळ्ळूर रोड येथील गणेशोत्सव मंडळाची बनविण्यात आली असून १८ फूट उंचीची मूर्ती येत्या १ -२ दिवसात पूर्णपणे तयार होईल.
सुरुवातीच्या काळात शाडूपासून मूर्ती बनविल्या जायच्या. मात्र अलीकडे गणेशभक्तांची मागणी काळानुसार बदलली आहे. नवनवीन कलाकुसर, विविध स्वरूपातील मूर्ती, रंगसंगतीत बदल यासारखे असंख्य बदल आता मूर्तिकलेत झाले असून आपल्यानंतर नव्या कलाकृती सादर करण्यासाठी आपली दोन्ही मुले आता व्यवसायात उतरली असून हा केवळ व्यवसायच नाही तर उत्तम कलादेखील असल्याचे मूर्तिकार मनोहर पाटील यांनी सांगितले.