बेळगाव लाईव्ह : सोशल मीडिया हा प्रकार हल्ली प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. कोणत्याही छोट्यात छोट्या गोष्टीसाठी सोशल मीडिया हे हक्काचे व्यासपीठ बनले आहे.
घरात एखादी वस्तू खरेदी केली किंवा एखादी दुःखद घटना घडली, मित्र-मैत्रिणींचे स्नेहमेळावे असोत किंवा सहजच एखादा ‘क्लिक’ या साऱ्या गोष्टींचे ‘अपडेट्स’ जोवर सोशल मीडियावर अपलोड केले जात नाहीत, तोवर कित्येकांचे श्वास खुंटतात! इतकेच नव्हे तर पोटात कितीही कावळे आरडा ओरडा करत असले तरी ‘वदनी कवळ’ घेण्यापूर्वी समोर आलेल्या पक्वान्नांची आपोष्णी (ताटाभोवती जेवणापूर्वी पाणी शिंपडण्याची क्रिया) ‘क्लिक’च्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड केल्याशिवाय घशातून घास उतरत नाही, असे केविलवाणे चित्र सध्या सर्वत्रच दिसत आहे….!
सोमवारी बहीण भावाच्या अतूट नात्याचा रक्षाबंधनाचा सोहळा पार पडला. महिनाभरापासून रिल्स ने धुमाकूळ घातला होता. अनेकप्रकारच्या मार्मिक, विनोदी रिल्सने तर अनेकांना वेड लावले.
शुभेच्छा देणारे मेसेज, रक्षाबंधनावर आधारित गाणी इतकेच नव्हे तर राख्यांची निवड कशी असावी इथपर्यंत सर्व गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड वायरल झाल्या. प्रत्येकाने आपापल्या परीने रक्षाबंधन साजरे केले. आणि लागलीच याचे स्टेटस देखील सोशल मीडियावर वायरल झाले… सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येकाच्या वॉट्सऍप स्टेटसवर रक्षाबंधनाचा सोहळा सजला…
सोशल मीडियाचे वेड केवळ तरुणांनाच नाही तर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना जडले आहे. परंतु या गुंत्यात प्रत्येकजण जखडत चालला असून सोशल मीडिया हे ‘स्लो पॉयझनिंग’चे काम करत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी अनेक ‘क्लिक’ केले जातात. परंतु या ‘क्लिक’च्या पार्श्वभूमीवर खरोखरच नात्यात गोडवा आहे का? हा प्रश्न मात्र प्रत्येकालाच अंतर्मुख करणारा आहे.
सोशल मीडियामुळे जग जवळ आले, हरवलेली नाती शोधता आली. दुरावलेली माणसे शोधता आली. मात्र माणसाची मने, तत्वे, विचार हे दुरावत चालल्याचे दिसून येत आहे.. सोशल मीडियामुळे भावनिक पैलू नष्ट होत चालले आहेत. सोशल मीडियामुळे मानवी जीवनावर अनेक परिणाम होत आहेत. याचा मानसिक, शारीरिक, आर्थिक गोष्टींवर परिणाम देखील दिसून येत आहे.
कित्येक सण-वार-उत्सव-कार्यक्रम-समारंभ हे केवळ सोशल मीडियावर ‘शो ऑफ’ करण्यासाठीच साजरे केले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. यामुळे हल्ली कोणत्याही सण-वार-उत्सव-कार्यक्रम-समारंभामागचा मूळ उद्देश हरवत चालला आहे, किंबहुना मागे पडत चालला आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. सोशल मीडियावर केवळ प्रदर्शन करण्यासाठीच कित्येकजण सण-वार-उत्सव-कार्यक्रम-समारंभ साजरे करतात.
यामागे आर्थिक नियोजन कित्येकांचे ढासळते. हौसेला मोल नसते हे जरी खरे असले तरी कोविड नंतर देशाची आर्थिक गती ज्या दिशेने जात आहे, त्यात अधिकाधिक सर्वसामान्य, मध्यमवर्गीय आणि दारिद्र्यरेषेखालील समाज भरडला जात आहे, हे देखील तितकेच वास्तववादी सत्य आहे. यामुळे सोशल मीडियाच्या अति वापराला न भुलता, न भुरळता वास्तववादी विचार करून आनंदाचे सोहळे साजरे करणे, मनापासून नाती जपणे हि काळाची गरज आहे.