बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यातील सर्व शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात सीईटी-नीट सराव परीक्षांचे आयोजन करण्यात यावे, सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी या परीक्षांची तयारी करण्यासाठी संसाधन व्याख्यातांद्वारे सराव परीक्षा आयोजित करून,
सीईटी पॅटर्न प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या शनिवारी पदवीपूर्व महाविद्यालयात सीईटी-नीट सराव परीक्षांचे आयोजन करण्यात यावे असे निर्देश जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले. आज बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील शासकीय पदवीधर महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
बेळगाव आणि चिक्कोडी विभागात सीईटी-नीट सराव परीक्षा पद्धतशीरपणे आयोजित करण्यासाठी चार समित्या यापूर्वीच स्थापन करण्यात आल्या आहेत. पहिली समिती- शैक्षणिक समिती, प्रश्नपत्रिका तयार करणे आणि निकालानंतर प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण दुसरी समिती- प्रशासकीय समिती, परीक्षा नीटपणे पार पाडणे,
तिसरी समिती- ओएमआर स्कॅनिंग समिती- ओएमआर स्कॅनिंग कार्य, महाविद्यालयनिहाय निकाल प्रकाशित करणे, चौथी समिती- समन्वय समिती चिकोडी आणि बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील परीक्षेसाठी कामाचा समन्वय अशा समित्यांची रचना करण्यात आली आहे.
त्यानुसार, शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी पहिली सराव परीक्षा एकाच वेळी बेळगाव आणि चिक्कोडी विभागात घेण्याच्या आणि परीक्षेचे पावित्र्य व गोपनीयता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात सराव करणारे विद्यार्थी हुशार आहेत. सीईटी-नीट परीक्षेबाबत मार्गदर्शन देऊन त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारता येणे शक्य आहे. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना विकसित होण्यास आणि आगामी परीक्षेला कोणत्याही भीतीशिवाय सामोरे जाण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
या बैठकीत जिल्हा पंचायतीचे मुख्य नियोजन अधिकारी गंगाधर दिवातार, उपसंचालक एम.एम. कांबळे (बेळगाव), उपसंचालक पी.आय.भंडारे (चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा), शैक्षणिक समिती सदस्य एफ.एम. कापसे, प्रशासकीय समिती सदस्य बी.वाय. हन्नूर, ओ.एम.आर. स्कॅनिंग समिती सदस्य सचिन व समीर, तसेच बेळगाव व चिक्कोडी विभागातील शासकीय पूर्व पदवीधर महाविद्यालयांचे व्याख्याते उपस्थित होते.